संग्रहित छायाचित्र
फेसबुकवरील मैत्रिणीने प्रेमाने भेटायला ये म्हणून सांगितल्याने भुललेला एक जण तोतया पोलिसांच्या तावडीत सापडला. त्यांनी जबरदस्तीने बँकेच्या एटीएममधून ५४ हजार रुपये काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात घडला आहे.
या प्रकरणी रावेत येथे राहणाऱ्या ४६ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी फेसबुकवरून मनीषाजी नावाच्या एका महिलेच्या संपर्कात आला होता. तिने फेसबुक कॉल करुन वारजे माळवाडी येथील स्वर्णा हॉटेल येथे त्यांना भेटायला बोलावले. त्याप्रमाणे फिर्यादी तेथे गेले. मात्र मनीषा ऐवजी त्या ठिकाणी दोन अनोळखी इसम तेथे आले.
“आम्ही सायबर पोलीस असून तू मुलींना ट्रॅप करतो, त्यांचे व्हिडिओ काढतो, हे आम्हाला चेक करायचे आहे. आमच्याबरोबर चौकीला चल” अशी धमकी त्यांना दिली. आपण सायबर विभागाचे पोलीस असल्याची बतावणी केली. त्याला धमकावून वारजे माळवाडी येथील एचडीएफसी बँक एटीएममधून ५३, ५०० रुपये काढून देण्यास भाग पाडले.