वाकड पोलीसांकडून अवघ्या १२ तासात आरोपी गजाआड
माळशिरस येथील सोलापूर जिल्हा बँक फोडून ५१ लाख १६ हजार रुपयांची रोकड घेऊन चोरटे फरार झाल्याची घटना घडली होती. मात्र, अवघ्या १२ तासातच वाकड पोलीसांनी आरोपींना अटक केली आहे. पिंपरी येथून १८ जुलै रोजी वाकड पोलीसांनी दोन जणांना अटक केली आहे.
फैसल इब्राहीम शेख (वय २९, रा. विजयनगर, पिंपळेगुरव, पुणे मुळ रा. तानाजी नगर, उल्हासनगर, जि.ठाणे) आणि शाहरुख सत्तार पटवारी (वय २८, रा. द वाईट हाऊस हॉटेलच्या पाठीमागील चाळीमध्ये, औंध पुणे, मुळ रा. मुपो. तळनी ता. औसा जि.लातुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी मंगळवारी (दि. १८) माळशिरस येथील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा सदाशिवनगर येथे तीन चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने बँकेच्या स्ट्रॉंगरुम मधून ५१ लाख १६ हजार ४७७ रुपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेचे शाखा अधिकारी भारत लोंढे यांनी माळशिरस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार माळशिरस पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात कलम ४५७, ४५४, ३८० आणि ३४ नुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला होता.
मंगळवारी वाकड पोलीस गस्त घातल असताना पिंपरीतील मोरवाडी येथे चोरटे येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार, वाकड पोलीसांनी मोरवाडी कोर्टाकडे जाणाऱ्या रोडलगत सापळा रचला. या दरम्यान एका पांढरे रंगाची स्विफ्ट डिझायर कार नं. एमएच. १४. एचक्यु. ९७८१ मधुन मिळाल्या माहितीनुसार संशयीत चोरटे आणि त्याचे सहकारी उतरले. यावेळी पोलीसांनी त्यांना ताब्यात घेवून कसून चौकशी केली. यावेळी आपण बँकेत चोरी केल्याची कबुली चोरट्यांनी दिली. वाकड पोलीसांनी आरोपी आणि मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपींना सोलापुर ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस पथकाचे ताब्यात देण्यात आले आहे.