पुणे पोलीस आणि एटीएसची मोठी कारवाई; दोन संशयितांना अटक, एक फरार
पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजेच एटीएसने मोठी कारवाई केली आहे. एटीएसने पुण्यात दोन जणांना ताब्यात घेतले आहे. देशविरोधी कृत्याच्या संशयावरुन दोन आरोपींना कोथरूड भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे पोलीस आणि एटीएसकडून १८ जुलै रोजी पहाटे ३ च्या सुमारास ही संयुक्त करवाई करण्यात आली आहे.
इम्रान खान आणि युनूस साकी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मात्र, त्यांच्या तिसरा साथीदार पळून गेला आहे. या आरोपींच्या अटकेसाठी एनआयएने प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते.
याबाबत माहिती देताना पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले की, संबंधित तीनही संशयित आरोपी हे पुण्यातील कोंडवा परिसरात वास्तव्यास आहेत. पण ते कोथरुडमध्ये सारखे ये-जा करायचे. कोथरुड येथून ते काहीतरी संशयास्पद काम करत असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यातून एटीएस आणि कोथरुड पोलीस यांनी संयुक्त विद्यमाने संबंधित ठिकाणी धाड टाकली. यावेळी एकजण फरार झाला. तर दोघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून १ जिवंत काडतुसे, ४ मोबाईल फोन आणि लॅपटॉप सापडला आहे. त्यांच्या लॅपटॉपमध्ये संशयास्पद डेटा आढळला असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशातील काही देशविधातक कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर एटीएस, गुप्तचर यंत्रणा त्या तिसऱ्या साथीदाराचा शोध घेत आहेत. तसेच पोलीसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.