Pune Crime News : पुण्यात कोयता, बंदुकीचा थरार; वाईन शॉपवर सशस्त्र दरोडा

क्रिकेटच्या वर्ल्ड कपची भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चुरशीची लढत पाहण्यासाठी नागरिक टीव्ही समोर बसून होते. या काळात रस्ते ओस पडले होते. नेमकी हीच संधी साधत चोरट्यांनी पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ असलेल्या एका वाईन शॉपवर सशस्त्र दरोडा

Pune Crime News

पुण्यात कोयता, बंदुकीचा थरार; वाईन शॉपवर सशस्त्र दरोडा

'वाईन शॉप'वर सशस्त्र दरोडा उत्तमनगर येथील शिवणेमधील घटना : आर. आर. वाईन्समधून ३ लाख १२ हजारांचा मुद्देमाल लंपास

पुणे : क्रिकेटच्या वर्ल्ड कपची भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चुरशीची लढत पाहण्यासाठी नागरिक टीव्ही समोर बसून होते. या काळात रस्ते ओस पडले होते. नेमकी हीच संधी साधत चोरट्यांनी पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ असलेल्या एका वाईन शॉपवर सशस्त्र दरोडा (armed robbery) टाकत ३ लाख १२ हजारांची रोकड लंपास केली. ही घटना शिवणे येथील एनडीए रस्त्यावर असलेल्या आर. आर. वाईन्स दुकानात घडली. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस (Uttamnagar Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात गोळीबार, खून आणि खूनाच्या प्रयत्नाचे गुन्हे वाढलेले असतानाच आता गुन्हेगारांची मजल सशस्त्र दरोडे टाकण्यापर्यंत गेली आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित आहे की नाही असा सवाल केला जात आहे.  (Pune Crime NEws)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by civicmirror (@civicmirrorpune)

याप्रकरणी मनोज बाळासाहेब मोरे (Manoj More) (वय ३३, रा. कृष्णा रेसिडेन्सी, कोंढवे धावडे) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सहा अज्ञात आरोपींविरुद्ध भादवि ३९५, ५०६, ३४, आर्म अॅक्ट कलम ३ (२५), ४ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा ३७ (१) सह १३५, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मोरे हे एनडीए रस्त्यावर असलेल्या कोहिनूर चौकामध्ये असलेल्या आर. आर. वाईन्स या दुकानात मॅनेजर पदावर काम करतात. मोरे दुकानात रात्री सव्वा नऊच्या सुमारास ग्राहकांना मद्य विक्री करीत होते. त्यावेळी अन्य कामगार देखील दुकानात हजर होते. तेव्हा दोन दुचाकीवरुन चोरटे आले. अंदाजे २० ते २२ वयोगटातील चार जण दुकानात शिरले. त्या पैकी एकाने पिस्तूल बाहेर काढले. हे पिस्तूल लोड करून मोरे यांच्यावर रोखून धरले. त्यांच्याकडे खंडणीची मागणी करीत गोळी झाडण्याची धमकी दिली. घाबरलेले मोरे जीव वाचविण्यासाठी दुकानातुन बाहेर पळाले आणि शेजारी असलेल्या एका दुकानात जाऊन लपले.

दरम्यान, चोरट्यांपैकी दोघांनी त्यांच्यासोबत लपवून पोत्यातील टोकदार धारदार तलवारी बाहेर काढल्या. चोरट्यांचा आक्रमक पवित्रा पाहून अन्य कामगार देखील दुकानाबाहेर पळाले. तसेच, ग्राहक देखील जीवाच्या आकांताने पळत सुटले. दुकानात शिरलेल्या चार चोरट्यांनी काऊंटरवरुन उड्या मारत दुकानात प्रवेश केला. पैसे ठेवायच्या ड्रॉव्हर मधील रोख रक्कम जशी हाती लागेल तशी बाहेर काढत पिशवीमध्ये भरायला सुरुवात केली. चोरट्यांनी एकूण ३ लाख ९ हजार रुपयांची रोकड चोरली. यासोबतच, ३२०० रुपयांच्या ब्लेंडर प्राइड कंपनीच्या दोन दारूच्या मोठ्या बाटल्या लंपास केल्या. हा सर्व मुद्देमाल घेऊन काऊंटरवरुन उड्या मारून चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. दुकानाबाहेर थांबलेल्या दोन चोरट्यांनी हवेत तलवारी नाचवित दहशत निर्माण केली.

घटनेची माहिती समजल्यानंतर गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त भीमराव टेळे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुनील तांबे, उत्तमनगरचे वरिष्ठ निरीक्षक किरण बालवडकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळापासून उत्तमनगर पोलीस ठाणे अगदी हाकेच्या अंतरावर आहे.  एवढा मोठा दरोडा पडलेला असतानाही पोलिसांना याची माहिती समजली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांची गस्त, खबऱ्यांचे जाळे नसल्याचे हे चित्र आहे. उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कानउघडणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भारत आँस्ट्रलिया क्रिकेट सामना असल्याने नागरिक सामान्य पाहण्यात व्यग्र होते. चौकाचौकात गर्दी होती. पोलीस देखील गस्तीवर होते. परंतु, चोरट्यांनी  अचानक हल्ला करीत वाईन शॉप लुटले. गर्दीचा फायदा घेत आरोपी पसार झाले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून आरोपींच्या मागावर तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच त्यांना ताब्यात घेण्यात येईल.

- किरण बालवडकर, वरिष्ठ निरीक्षक, उत्तमनगर पोलीस ठाणे

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest