Market Committee : कृषी उत्पन्न बाजार समितीतही 'कोयता'; पथारी व्यावसायिकाने सुरक्षारक्षकाला धमकावले

गुलटेकडी भागातील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील शिवनेरी रस्त्यावरील नो हॉकर्स झोन करण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यावर नो पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या वाहनांवर तसेच हातगाड्यांवर, किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येते. त्यानुसार कारवाई करताना एक हातगाडी उचलण्यात आली होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 9 Oct 2023
  • 05:29 pm
Market Committee : कृषी उत्पन्न बाजार समितीतही 'कोयता'; पथारी व्यावसायिकाने सुरक्षारक्षकाला धमकावले

कृषी उत्पन्न बाजार समितीतही 'कोयता'; पथारी व्यावसायिकाने सुरक्षारक्षकाला धमकावले

कोयता दाखवून नो पार्किंगमधून गाडी सोडवून घेतल्याचा आरोप

अमोल अवचिते

पुणे : गुलटेकडी भागातील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील शिवनेरी रस्त्यावरील नो हॉकर्स झोन करण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यावर नो पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या वाहनांवर तसेच हातगाड्यांवर, किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येते. त्यानुसार कारवाई करताना एक हातगाडी उचलण्यात आली होती. त्याचा राग आल्याने गाडी मालकाने सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करत कमरेला लावलेला कोयता आणि खिशातील चाकू काढून गाडी लगेच सोडा अन्यथा याचे वाईट परिणाम होतील. अशी धमकी देत कारवाई करण्यात आलेली गाडी सोडवून घेतली. असे येथील सुरक्षा रक्षकाने 'सिवीक मिरर' शी रविवारी (ता.८)बोलताना सांगितले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी, व्यापारी, किरकोळ विक्रेते तसेच नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. त्यांची वाहने लावण्यासाठी समितीकडून पार्किंगची सशुल्क व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शिवनेरी रस्ता नो हॉकर्स झोन करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावर पथारी व्यवसायिकांना, किरकोळ विक्रेत्यांना बसण्यास बंदी घालण्यात आली आहे. या रस्त्यावर अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यासाठी समितीकडून कायदेशीर टेंडर प्रक्रिया राबवून खासगी कंपनीला ठेका देण्यात आला आहे. त्यानुसार स्टार सर्व्हिसेस या कंपनीला ठेका मिळालेला आहे. या कंपनीकडून रस्त्यावर नोपार्किंगमध्ये असलेली वाहने, विक्रेते आणि हातगाडी लावणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येते. रस्त्यावर हातगाडी लावण्यास बंदी असताना देखील एका म्होरक्याकडून पाच ते सहा हातगाड्या रस्त्याच्या बाजूला लावल्या जातात. त्या हातगाड्यांवर केळी, मोसंबी, ड्रागन फूड आदी प्रकारची फळांची विक्री केली जाते. या हातगाडीवाल्यांना नियमानुसार तीन वेळा तोंडी समज देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही गाड्या काढण्यास त्यांनी नकार दिला, त्यामुळे नियमानुसार या कंपनीकडून हातगाडी उचलण्याची कारवाई केली. कारवाईतून उचलेली हातगाडी पार्किंगमधील एका जागेववर आणून ठेवण्यात आली होती. गाडी उचलेल्यामुळे गाडीमालकाला राग आला होता. त्या रागातून त्याने सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ केली. तसेच कंबरेला लावलेला कोयता आणि खिशातील चाकू काढत त्याने गाडी सोडली नाही तर परिमाण वाईट होतील. अशी धमकी दिली आणि कोणताही दंड न भरता गाडी सोडवून नेली. अशी कैफियत येथील सुरक्षा रक्षकाने सिवीक मिररपुढे रविवारी (ता.८) मांडली. या प्रकरणी सुरक्षा रक्षकाच्या माध्यमातून कंपनीच्या कर्मचाऱ्याने महर्षी नगर पोलिस चौकीत याबाबत तक्रार दाखल केली आहे.

शिवनेरी रस्त्यावर अतिक्रमण होऊ नये यासाठी कंपनीने आम्हांला नेमले आहे. कोणी अतिक्रमण केले असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. गाड्या उचलण्यासाठी कंपनीने छोटा टेम्पो दिला आहे. या टेम्पोत एका वेळी फक्त एकच हातगाडी ठेवता येते. त्यामुळे एकाच वेळी हातगाड्यांवर कारवाई केली तरी एक एक गाडी उचलून नेण्यात येते. त्यावेळी उचलायच्या तर सर्वच गाड्या एका वेळेस उचला असे म्हणत हातगाडीवाल्यांकडून वाद घातला जातो. यातून अनेकवेळा शिवीगाळ केली जाते. मोठी कारावाई असेल तर पोलिसांची मदत घेतली जाते. पोलिसही वेळोवेळी मदत करतात. यावेळी झालेला वाद किरकोळ स्वरुपातील असला तर मारण्याची धमकी दिल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

 - अतिक्रमण कारवाईतील एक कामगार

असा आकारला जातो दंड..

शिवनेरी रस्त्यावर हातगाडी लावण्यात आली असल्याचे आढळून आल्यास पहिल्यांदा कारवाई करताना २ हजार ३६० रुपये दंड आकारण्यात येतो. तसेच तीच हातगाडी पुन्हा कारवाई दरम्यान आढळून आल्यास त्याच्यावर दुसऱ्यांदा ५ हजार ९६० रुपयांचा दंड वसूल केला जातो. तसेच या रस्त्यावर नो पार्किंगमध्ये दुचाकी आढळून आल्यास २६० रुपयांचा दंड आकारण्यात येतो. अशा प्रकारचा दंड तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना आकारण्यात येत असल्याचे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

यापूर्वी रस्त्यावर राहत होती सुमारे ४०० कुटुंबे

शिवनेरी रस्त्यावरील पदपथावर सुमारे ४०० कुटुंबे राहत होती. त्यांच्याकडून रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले होते. तसेच किरकोळ विक्री करण्यास बसत होते. त्यांच्यामुळे इतर हातगाडीवाले, विक्रेत्यांची गर्दी रस्त्यावर होत होती. अतिक्रमण वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे समितीने कायदेशीर टेंडर प्रक्रिया राबवून अतिक्रमण मुक्तीसाठी खासगी कंपनीची नेमणूक केली. आता रस्ता मोकळा करण्यात आला आहे. काही मोजके कुटूंबे सोडली तर रस्त्यावर कोणी राहत नाही. मात्र काही हातगाडीवाले परवानगी नसताना रस्त्यावर धंडा करतात. त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करण्यात येते. असे स्टार सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हातगाडी मालक, कामगार यांच्यात वाद झाल्याची तक्रार पोलिसांकडे आली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार खरच असा प्रकार घडला आहे, का याचा तपास करण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जाते. वारंवार या रस्त्यावर पोलिसांकडून गस्त घालण्यात येते. जर कोणी अशी धमकी किंवा दमदाटी करत असेल तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल.

  - उमेश कारके,  सहायक पोलिस निरीक्षक, महर्षी नगर पोलिस चौकी .

पार्किंगचे टेंडर ज्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडून कारवाई करण्यात येते. एवढीच मला माहिती आहे. मी मुंबईला गेलो असताना माझी हातगाडी आणि दुचाकी उचलण्यात आली होती. त्यावेळी कामगार आणि अतिक्रमण विरोधी कारवाई करणाऱ्या कामगारांसोबत वाद झाला. त्याने कोणालाही धमकी दिली नाही. मी देखील पोलिसांकडे खोटी तक्रार दिल्याबद्दल तक्रार देणार आहे. आम्ही या रस्त्यावर गेल्या २० वर्षांपासून धंडा करतो आहोत. वाहतूकीला अडथळा होणार नाही असे आम्ही थांबतो. समितीने आम्हांला परवानगी दिली होती. मात्र परवाना नुतनीकरण अद्याप दिलेला नाही.

- सुरजिंत सिंग कल्याणी, हातगाडी मालक.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest