माजी नगरसेवक पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील मारेकऱ्याला अटक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक तसेच खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय महेबुब सय्यदलाल पानसरे यांची जमीनीच्या वादातुन पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे ७ जुलै रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलीसांना मोठे यश आले आहे. पानसरे यांची हत्या करणाऱ्याला पोलीसांनी अटक केली आहे. ही कारवाई पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने केली आहे. दरम्यान, या अगोदर दोन जणांना अटक करण्यात आली होती.
दत्ता मारुती मळेकर (वय ४५, धंदा - ड्रायव्हर रा- ८८३ गुरुवार पेठ, महाराणा प्रताप रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्ता हा पुण्यातील वाघोली येथील गायरान परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली असता इतर साथीदारांच्या मदतीने पानसरे यांची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली.
पानसरे हत्या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात कलम ३०२, ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी दत्ताला पुढील कारवाईसाठी जेजुरी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास जेजुरी पोलीस करत आहेत.