संग्रहित छायाचित्र
पुण्यात परदेशी नागरिकांची घुसघोरी सुरूच असल्याचा प्रकार समोर आला आहे. हडपसर भागात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ११ बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले आहे. लष्कराची गुप्तचर यंत्रणा आणि पुणे पोलिसांनी ही कारवाई केली. तर व्हिसा मुदत संपलेली असताना सुध्दा चोरुन कोंढवा भागात राहत असलेल्या ४ युगांडा देशाच्या महिलांना पकडण्यात आले आहे. ही पुणे पोलीसांच्या विशेष गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनंतर हडपसर भागात सात बांगलादेशी नागरिकांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले होते. हडपसर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन तशी नोंद पोलीस ठाण्यातील पुस्तिकेत (स्टेशन डायरी) केली होती. चौकशीत सातजणांनी बांगलादेशीतील रहिवासी असल्याचे मान्य केले होते. मात्र, आरोपींकडे बांगलादेशी असल्याबाबतची कागदपत्रे न मिळाल्याने पोलिसांनी त्यांना चौकशी करुन सोडून दिले होते.
लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेकडून तपास करण्यात येत होता. त्यानंतर चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भारतात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना त्यांना आधारकार्ड, पॅनकार्ड, तसेच मतदार ओळखपत्र मिळवून दिल्याचे उघडकीस आले आहे. तर दुसऱ्या कारवाईमध्ये परदेशी नागरिक व्हिसा मुदत संपलेली असताना सुध्दा चोरुन कोंढवा भागात राहत आहेत का? याबाबत पोलीस माहिती घेत होते. तेव्हा महंमदवाडी येथील कन्हैया सोसायटी याठिकाणी युगांडा देशाच्या ४ परदेशी महिला त्याच्या व्हिसा मुदत सपलेल्या असताना सुध्दा लपुन राहत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली.
त्यानुसार पोलीसांनी कारवाई करत परदेशी नागरिकांचा व्हिसा व पोसपोर्ट कागदपत्राची पडताळणी केली. यामध्ये २ महिला भारत देशात वैदयकिय उपचार व २ महिला हया पर्यटनासाठी आल्याची व त्याच्या व्हिसाची मुदत संपवुन दीड वर्षे झालेले असताना लपवुन राहत असल्याचे उघडकीस आले. पोलीसांनी चारही महिलांना ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.