बुधवार पेठेत बांगलादेशी महिलांची घुसखोरी सुरूच, अवैध वेश्याव्यवसाय करणाऱ्या ५ महिलांना अटक
पुण्यातील बुधवार पेठेत पुन्हा एकदा बांगलादेशी महिला अवैध पद्धतीने वास्तव्य करत असल्याचे समोर आले आहे. अवैध पद्धतीने वास्तव्य करून वेश्याव्यवसाय करणाऱ्या बांगलादेशी महिलांवर कारवाई करण्यात आली आहे. यात पाच महिला आणि २ पुरूष अशा एकून ७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलीसांच्या सामजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
बांगलादेशी महिलांनी घुसघोरी करून भारतात प्रवेश केला होता. त्यानंतर त्या बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करण्यासाठी राहत होत्या. या महिला गेल्या अनेक महिन्यांपासून अवैधरित्या पुण्यात राहत होत्या. याबाबत माहिती मिळताच पोलीसांनी आज पहाटेच्या सुमारास धाड टाकून त्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर पासपोर्ट अँक्ट १९५० नुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील कारवाईसाठी त्यांना फरासखाणा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दरम्यान, काही दिवसांपुर्वी अशाच पद्धतीने बुधवार पेठेत अवैध वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलांवर पोलीसांनी कारवाई केली होती. पुणे पोलिसांची ही दुसरी मोठी कारवाई आहे. काही दिवसांपुर्वी करण्यात आलेल्या कारवाईत १० बांगलादेशी महिल आणि ९ पुरूष अशा एकूण १९ जणांना अटक करण्यात आली होती. तपासामध्ये १० बांगलादेशी महिला वेश्याव्यवसाय करीत होत्या. तर ०९ पुरुष हे वेगवेगळे व्यवसाय करीत असल्याचे समोर आले होते. आज पुन्हा एकदा कारवाई केली. मात्र, सातत्याने बांगलादेशी महिलांची घुसखोरी वाढत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.