संग्रहित छायाचित्र
पुण्यातील टोळक्यांचा हौदोस काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीये. सातत्याने वाहनांची तोडफोड, दरोडा यासह अन्य घटना घडताना दिसत आहेत. पोलीसांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. मात्र, तरी देखील पुण्यातील तळजाई वसाहतीत टोळक्यांनी पुन्हा एकदा दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. ५ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास १० ते १२ जणांच्या टोळक्यांनी खांबावरील लाईट, टपऱ्यांची तोडफोड करत दहशत निर्माण केली आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलीसांनी आठ जणांना अटक केली आहे. तर दोन विधिसंघर्षीत बालकांना ताब्यात घेतले आहे.
मयुर रंगनाथ आरडे (वय २२, रा. गल्ली नं. ६० तळजाई वसाहत पद्मावती, पुणे), रोहन ऊर्फ गायसोन्या राजु आरडे (वय २१, रा.सदर), ऋषीकेश ऊर्फ बारक्या संजय लोंढे (वय २३, रा. माने गिरणी पाठीमागे तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे), जयेश ऊर्फ जयडया दत्ता ढावरे (वय १९, रा. गल्ली नं. ७ तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे), वृषभ शंकर कांबळे (वय २३, रा. सदर), अनिकेत ऊर्फ गुड्डु रविंद्र शिंदे (वय २४, रा. महात्मा गांधी सोसायटी, पद्मावती, पुणे), आकाश मनोज डाकले (वय २३, रा. सदर) आणि आदित्य ऊर्फ सॅण्डी पद्माकर डाकले (वय २०, रा. सदर) अशी अटक कऱण्यात आलेल्या आठ आरोपींची नावे आहेत तर दोन विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी माऊली शिंदे (वय १९, रा. गल्ली क्र.४७, तळजाई वसाहत, पुणे) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माऊली हे ५ जुलै रोजी रात्री आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. यावेळी १० ते १२ जण हातात लाकडी दांडके व लोखंडी हत्यारे घेवून फिर्यादी यांच्याजवळ आले. तुम्ही रात्रीच्या वेळी येथे कशाला जमला आहात, तुम्ही काय भाई झाले आहात का? असे म्हणत टोळक्यांनी आरडा-ओरडा सुरू केला. तसेच तेथील टपरीचे लोखंडी धारदार हत्याराने व लाकडी दांडक्यांने तोडफोड करून नुकसान केले. रस्त्याच्या कडेला असलेल्या पोलवरील लाईटचे बल्ब हातातील लाकडी दांडक्याने फेकून मारून टोळक्यांनी फोडले.
आम्हीच इथले भाई आहोत, आमच्या नादाला कोणी लागले तर त्याला संपवुन टाकू, असे म्हणत टोळक्यांनी जमलेल्या लोकांना मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी माऊली शिंदे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीसांनी कलम १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६, ४२७, आर्म अॅक्ट ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३) १३५, क्रिमिनल लॉ अॅमेंडमेंट अॅक्ट कलम ७ सार्वजनिक संपत्ती क्षती निवारण अधि. १९८४ चे कलम ३ नुसार गुन्हा दाखल केला. तसेच आठ जणांना अटक केल असून दोन विधिसंघर्षीत बालकांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.