आनंदनगर येथे टोळक्याकडून वाहनांचे नुकसान, त्रस्त नागरिकांनीच दिला दोघांना चोप
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सातत्याने तोडफोडीच्या घटना घडताना दिसून येत आहेत. पोलीसांच्या कारवाईला देखील टोळके जुमानत नसल्याचे चित्र आहे. वाहनांची तोडफोड, हाणामारी, भाईगिरी यासह अनेक घटना घडत असल्याने पोलिसांचा धाक राहिला नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, आता त्रस्त झालेल्या नागरिकांनी टोळक्यांना चोर दिल्याचे समोर आले आहे. आनंदनगर झोपडपट्टीतील वाहनांचे नुकसान केल्याने रहिवाशांनी दोन जणांना चांगलाच चोप दिला आहे.
पिंपरी चिचवडमधील आनंदनगर झोपडपट्टीत नागरिकांच्या घरासमोर लावलेली वाहने खाली पाडत टोळक्यांनी नुकसान केले. शुक्रवारी (२५ ऑगस्ट) मध्यरात्री ही घटना घडली. मात्र, निष्कारण होणाऱ्या नुकसानामुळे नागरिकांनी टोळक्यातील दोघांना पकडून चोप दिला.
आनंदनगर झोपडपट्टी एका बाजून नागरिकांची घरे तर दुसऱ्या बाजून वाहने लावण्यास व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, शुक्रवारी मध्यरात्री येथील एका टोळक्याने घरांसमोर पार्क केलेल्या वाहनांचे नुकसान करण्यास सुरुवात केली. तेव्हा जाब विचारणाऱ्या नागरिकांना मारहाण करण्याचा प्रयत्न टोळक्याने केला. त्यामुळे नागरिकांनी नुकसान करणाऱ्यांना चांगला चोप दिला. धक्कादायक बाब, म्हणजे, सातत्याने तोडफोडीच्या घटना घडत आहेत. मात्र, टोळक्यांना व्यसन घालण्यात पोलिसांना अपय़श य़ेत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरत आहे. त्यामुळे अखेर त्रस्त झालेल्या नागरिकांकडून आता टोळक्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे म्हणाले, “सात ते आठ जणांनी आनंदनगर येथे वाहने ढकलून दिली. त्यावेळी नागरिकांनी त्या टोळक्याला अडवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एकजण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी तपास केला जात आहे.”