Crime News : पतीने केला पत्नीच्या ‘वो’चा खून

पत्नीच्या प्रियकराचा खून करून त्याचा मृतदेह मुळशी धरणात टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी पतीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Thu, 5 Oct 2023
  • 02:19 pm
Crime News

पतीने केला पत्नीच्या ‘वो’चा खून

मृतदेह मुळशी धरणात टाकला, आरोपी पतीला हिंजवडी पोलिसांकडून अटक

रोहित आठवले

पत्नीच्या प्रियकराचा खून करून त्याचा मृतदेह मुळशी धरणात टाकल्याचा  प्रकार उघडकीस आला आहे.  याप्रकरणी आरोपी पतीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली.

किशोर प्रल्हाद पवार असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अक्षय भास्कर खिल्लारे (वय २१, रा. बालेवाडी, मूळ रा. हिंगोली) याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार, किशोर पवार हे बेपत्ता असल्याची तक्रार २४ सप्टेंबर रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्याबाबत तपास करत असताना चौकशीत अक्षय खिल्लारे याचा पोलिसांना संशय आला. त्यावरून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केली. त्यावेळी बेपत्ता असलेल्या किशोर याचा आपण खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

आरोपी अक्षय याच्या पत्नीसोबत किशोर पवार याचे प्रेमसंबंध होते. आपल्या मित्राचे पत्नीसोबत संबंध असल्याचा संशय अक्षय याला होता. त्यातून त्याने किशोर यांना जीवे मारण्याचा कट रचला. २४ सप्टेंबर रोजी त्याने किशोर यांना दुचाकीवरून सुसगाव येथून वारक गावात मुळशी धरणाच्या बाजूला नेले. तिथे लघुशंका करण्याच्या बहाण्याने थांबून सोबत आणलेल्या विळ्याने किशोर पवार यांच्या मानेवर, चेहऱ्यावर वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर किशोर यांचे हात-पाय बांधून मृतदेह वारक गावातील मुळशी धरणाच्या पाण्यात टाकला असल्याचे अक्षय याने तपासात सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अक्षय याला बरोबर घेऊन जात किशोर याचा मृतदेह धरणातून काढून ताब्यात घेतला. किशोर आणि अक्षय हे एकमेकांचे मित्र असून, दोघांचे एकमेकांच्या घरी जाणे-येणे होते. आसपास चौकशी केल्यानंतर पोलिसांना अक्षयबाबत माहिती मिळाली होती. त्यावरून या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest