संग्रहित छायाचित्र
पुण्यात गुन्हेगारी थांबायचे नाव घेत नाहीये. दिवसेंदिवस मारहाण तोडफोडीच्या घडना वाढतच चालल्या आहेत. काही दिवसांपुर्वीच पुण्यातील सदाशिव पेठेत महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना घडली होती. आता पुन्हा एकदा एकतर्फी प्रेमातून तरुणीचे डोके फोडले असून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेत ३७ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना बुधवारी (दि. १२) सातच्या सुमारास कोरेगाव पार्कमधील बर्निग घाट परिसरात घडली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.
संकेत शहाजी म्हस्के (वय २६, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संकेत आणि ३७ वर्षीय महिला एकमेकांचे मित्र आहे. दोघेही एकाच परिसरात राहायला आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून तरुणी त्याच्यासोबत बोलत नव्हती. त्यामुळे संकेत प्रचंड संतापला.
ती भेटत नसल्या कारणाने संतापलेल्या संकेतने बुधवारी तिला बर्निग घाट परिसरात गाठले. ‘तू मला भेटत का नाही, माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझी होऊ शकत नाही, तर कोणाचीही होऊ देणार नाही’, असे म्हणत शिवीगाळ केली. मात्र, तरुणीने ‘माझे तुझ्यावर प्रेम नाही’, असे उत्तर दिले. त्यामुळे चिडलेल्या आरोपी संकेतने तरुणीला दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत तरुणी खाली पडली. खाली पडल्यावर संकेतने तिच्या डोक्यात दांडक्याने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत तरुणी गंभीर जखमी झाली आहे.
गंभीर जखमी झालेल्या तरुणीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीसांनी कलम ३०७, ३२३, ५०४ महा. पो. का. क.३७ (१) १३५ नुसार गुन्हा दाखल करून आरोपी तरुण संकेतला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कोरेगाव पार्क पोलीस करत आहेत.