संग्रहित छायाचित्र
एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कारवाया करून पोलीसांनी गांजा आणि अमिफ जप्त केला आहे. यामध्ये सुमारे ११ लाख २२ हजार ५०० रुपयांचे अंमली पदार्थ जप्त कऱण्यात आले आहेत. या प्रकरणी तीन जणांना पोलीसांनी अटक केली आहे. ही कारावाई पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी १ च्या पथकाने ११ जुलै रोजी केली आहे.
एक महिला (वय ४५, रा.मु.पो. खडकत, ता. आष्टी जि. बीड), लक्ष्मण गवनेर काळे (वय ५५, रा.मु.पो. पारधी वस्ती, हिसरे ता. करमाळा, जि. सोलापुर) आणि तुलछाराम गीगाराम चौधरी (वय ३९, रा. सध्या तुळजाभवानी नगर, आई माता मंदिरजवळ, सर्व्हे नंबर ६५८/४ बिबवेवाडी पुणे, मुळ रा. मुख्याग्राम मोडी, सतलान जोधपुर सतलान, राज्य राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाला ११ जुलै रोजी एक महिला व एक इसम हे हडपसर गाडीतळ येथील सिध्देश्वर पेट्रोलपंपा समोर गांजाचा विक्री करण्यासाठी आले असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचून एका ४५ वर्षीय महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून २ लाख ६६ हजार ६०० रुपये किमतीचा १३ किलो ३३० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. तर आरोपी लक्ष्मण काळेला ताब्यात घेवून त्याच्याकडून २ लाख ५६ हजार ४०० रुपये १२ किलो ८२० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींकडून एकूण ५ लाख २३ हजार रुपये किमतीचा २६ किलो १५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
तसेच १० हजार रुपये किमतीचा मोबाईल, ३ हजार ५०० रुपये रोख रक्कम, ५०० रुपये किमतीची कापडी पिशवी आणि ५०० रुपये किमतीची बॅग असा एकुण ५ लाख ३७ हजार ५०० रुपये किमतीचा जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करून हडपसर पोलीस ठाण्यात एन. डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) (ii) (क) २९ अन्वये गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
तर दुसऱ्या कारवाईमध्ये मार्केट यार्ड लेन नंबर ०३ गणेश मंदिरा समोरून आरोपी तुलछाराम चौधरीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून ५ लाख ८५ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामध्ये २५० ग्रॅम आफिम हा अंमली पदार्थ ५ लाख रुपये किमतीचा तसेच १५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन, ५० हजार रुपये किमतीची एक सुझुकी अॅक्सेस गाडी, रोख रुपये असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलीसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), १७ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.