संग्रहित छायाचित्र
डीआरडीओ ऑफिसर्स को ऑप हौसिंग सोसायटीच्या नावाचा गैरवापर करून बनावट कागदपत्रे तयार केली. तसेच जागेची विक्री करून फसवणूक केली. सुसगाव येथे २०२२ ते २५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ही घटना घडली.
चेतन रमेश डवरे (४३, रा. पाषाण) यांनी याप्रकरणी हिंजवडी (बावधन) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चेअरमन रणजितकुमार सूर, सेक्रेटरी देबाशिष चक्रबर्ती, विद्यानंद बगनेरा, नरेश नरेंद्र मसे, शैलेश रामराव गुरनुले, खयाली राम कुलारी, नितीन चंद्रकांत जवळकर व त्यांना मदत करणारे इतर साथीदारांसह एका महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बीएनएस कलम ३१८ (४), ३३६(२) (३), ३३८, ३४० (२), ६१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चेतन डवरे हे बावधन येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) येथे नोकरीला आहेत. त्यांची डीआरडीओ ऑफिसर्स को ऑप हौसिंग सोसायटी आहे. या सोसायटीची सूसगाव येथे सर्व्हे क्रमांक १२०/५ मधील ३९ गुंठे जागेची विक्रीची कोणतीही लेखी परवानगी तसेच सोसायटीचा कोणताही सभासद नसताना संशयितानी सोसायटीच्या नावाचा गैरवापर करून बनावट कागदपत्रे तयार केली. तसेच सोसायटीचे नोंदणीकृत प्रमाणपत्र बनवले. संबंधित जागा ही ॲग्रीमेंट टू सेल दस्तावेज करून एकूण एक कोटी २६ लाख ७५ हजार रुपयांना नितीन जवळकर याच्याशी एप्रिल २०२२ मध्ये विक्रीचा करार केला. नितीन जवळकर याने सोसायटीच्या मालकीचा जागेबाबतचा कोणताही सर्च रिपार्ट न काढता संगणमत करून सोसायटीचे सभासद नसलेल्या संशयितांनी सोसायटीचे खोट्या लेटरहेडचा वापर करून सोसायटीचे ठराव केले. तसेच रजिस्टर सोसायटीचे नाव पत्ता तसेच शिक्के याचा वापर करून फिर्यादी चेतन डवरे यांच्या सोसायटीच्या मालकीची ताबा वहिवाटीची जागा बेकायदेशीररित्या विक्री करून फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.