पाच पिस्टल, दहा काडतुसे जप्त; चार सराईत गुन्हेगारांना अटक
पिंपरी चिंचवड पोलीसांच्या खंडणी विरोधी पथकाने चार सराईत गुन्हेगारांना अटक केली. त्यांच्याकडून पाच पिस्टल आणि दहा काडतुसे करण्यात आली आहेत.
अस्लम अहमद शेख (रा. थेरगाव), सचिन उत्तम महाजन (रा. सुरवड, ता. इंदापूर), संतोष विनायक नातू (रा. स्वारगेट, पुणे), राहुल उर्फ खंडू गणपत ढवळे (रा. पिंपळगाव, ता. दौंड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकातील पोलीस रमेश गायकवाड, गणेश गिरीगोसावी, विजय नलगे रहाटणी येथे गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना जगताप डेअरी चौकात एकजण थांबला असून त्याच्याकडे शस्त्र असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अस्लम शेख याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक पिस्टल जप्त केली.
त्यानंतर त्याच्याकडे चौकशी करून त्याच्या तीन साथीदारांना अटक करून आणखी चार पिस्तल आणि दहा काडतुसे असा एकूण दोन लाख 55 हजारांचा ऐवज जप्त केला. सचिन, संतोष, राहुल हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर पुणे, पुणे ग्रामीण आणि सोलापूर येथे दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण, जबरी चोरी, जबर दुखापत करणे, बेकायदेशीरपणे अग्नी शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. आरोपी सचिन महाजन याच्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोकाची कारवाई केली आहे. तर संतोष नातू याला पुणे पोलिसांनी तडीपार केले आहे.
सहायक पोलीस आयुक्त सतिश माने, वरिष्ठ निरीक्षक अरविंद पवार, सहायक पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहायक पोलीस उप निरीक्षक रमेश गायकवाड, अमर राऊत, तसेच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार निशांत काळे, गणेश गिरीगोसावी, विजय नलगे, सुनिल कानगुडे, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, रमेश मावसकर, प्रदीप गायकवाड, शैलेश मगर, चंद्रकांत जाधव, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सुधीर डोळस, प्रदीप गुट्टे, भरत गाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.