पुण्यातून तब्बल ५० कोटींचा मेथाक्युलोन अंमली पदार्थ जप्त
पुणे परिसरातून तब्बल ५० कोटी रुपयांचा १०१ किलो मेथाक्युलोन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तेलंगणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि हरियाणा येथील रहिवासी असलेल्या ५ जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) पथकाने केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीआरआयच्या अधिकाऱ्यांना एका कारमध्ये पाच जण मेथाक्युलोनसह पुण्यात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलीसांनी सापळा रचून एक वाहन जप्त केले. वाहनात पांढरे स्फटिकाचे साहित्य असलेले ४ निळ्या रंगाचे प्लास्टिकचे ड्रम आढळून आले. यामध्ये मेथाक्युलोन हा पदार्थ आढळला.
त्यानंतर पोलीसांनी पाच जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी बेकायदा विक्री, खरेदी, वाहतूक आणि निर्यातीत गुंतलेले असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. मेथाक्युलोन अमली पदार्थ विक्रीचे जाळे देशातील अनेक राज्यांमध्ये पसरलेले असल्याची शक्यता असून, त्याअनुषंगाने तपास करण्यात येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.