संग्रहित छायाचित्र
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १८ नोव्हेंबर सायंकाळी ६ वाजल्यापासून ते २० नोव्हेंबरला मतदानप्रक्रिया पार पडेपर्यंत आणि २३ नोव्हेंबर मतमोजणीच्या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघांचे निकाल घोषित होईपर्यंत कोरडा दिवस (ड्रायडे) घोषित करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे पुणे अधीक्षक सी. बी. राजपूत यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर विविध पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व हातभट्टी निर्मिती वाहतुक विक्री, तसेच धाबे, अवैध ताडी धंदे यांच्यावर १ ऑक्टोबरपासून कारवाई करण्यात येत आहे.
१ ऑक्टोबरपासून आतापर्यंत जिल्ह्यात ९२३ गुन्हे नोंदवले असून ८४३ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये ९६ वाहनासह एकुण ३ कोटी ५१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सराईत गुन्हेगारांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ९३ अन्वये एकूण ५० प्रस्ताव संबंधित दंडाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी या व्यक्तिंकडून चांगल्या वर्तणूकीचे बंधपत्र घेण्यात येत आहे. आतापर्यंत १२ प्रकरणामध्ये ९ लाख ८० हजार रुपये एवढ्या रक्कमेचे बंधपत्रे घेण्यात आली आहेत. तसेच या काळात गोवा राज्य निर्मित मद्याचे दोन गुन्हे उघडकीस आले असुन या गुन्ह्यांमध्ये ३ लाख ६४ हजार १७० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात अवैध मद्य वाहतुकीस आळा घालण्याच्या दृष्टींने एकुण १८ तात्पुरते चेकनाके उभारुन संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी अवैध मद्याची वाहतूक केली जाणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. तसेच मद्य विक्रीच्या अनुज्ञप्तींचे नियमित निरीक्षण करण्यात येत असुन अनुज्ञप्त्या विहीत वेळेत चालू व बंद होतील तसेच अल्पवयीन ग्राहकांना मद्यविक्री होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. तसेच निवडणूक आयोग व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशाप्रमाणे कामकाज करण्यात येत असल्याची माहिती राजपूत यांनी दिली.
जिल्ह्यात १८ नोव्हेंबर सायंकाळी ६ वाजल्यापासून ते २० नोव्हेंबर मतदानप्रक्रिया पार पडेपर्यंत आणि २३ नोव्हेंबर मतमोजणीच्या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघांचे निकाल घोषित होईपर्यंत कोरडा दिवस (ड्रायडे) घोषित करण्यात आला असल्याची माहिती राजपूत यांनी दिली. या काळात जिल्ह्यातील मद्य विक्रीच्या अनुज्ञप्ती बंद राहतील.