संग्रहित छायाचित्र
प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ३ श्वानांना क्रूरपणे बांधून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. 3) सायंकाळी सातच्या सुमारास संकल्पनगरी देहूरोड येथे घडली. या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पियुष हरिशकुमार चतुर्वेदी (वय २९, रा. भूमकर चौक, ताथवडे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड येथील बँक ऑफ इंडियाजवळ असलेल्या संकल्पनगरी येथे ३ श्वानांना प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये बांधले असल्याची माहिती फिर्यादी चतुर्वेदी यांना मिळाली.
श्वानांचे तोंड कापडी टेपणे, पाय दोरीने बांधले होते. क्रूरपणे तीन श्वानांना प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये बांधून शांत केले होते. ठार मारण्याच्या अथवा अपंग करण्याच्या उद्देशाने श्वानांना आरोपी घेवून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम ४२९, ५११ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.