बांगडी कटींग करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक, २५ ग्रॅम सोने जप्त
बांगडी कटींग करणाऱ्या रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांसह पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून २५ ग्रॅम सोन्याची पाटली आणि कटर असा एकूण १ लाख २० हजार २५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे पोलीसांच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ आणि गुन्हे शाखा यांनी संयुक्त कारवाई करत वाडीया कॉलेजकडून कोरेगाव पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरून दोघांना अटक केली आहे.
संतोष ऊर्फ मॅनेजर शरणप्पा जाधव (वय ४१, रा. मांजरी बुद्रुक, पवार बिल्डींग, वरद हॉस्पिटल, हडपसर, पुणे, मुळगाव- काळंगरी, पो. औलद, ता. जि. गुलबर्गा व दुधणी ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) आणि सुधीर ऊर्फ तुंडया नागनाथ जाधव (वय ४५, रा. शास्त्री नगर साईनाथ मंदीरा शेजारी अंबरनाथ वेस्ट जिल्हा ठाणे, सध्या पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलींग करीत असताना पोलीसांना खबऱ्यामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील बांगडी कटींग करणारा गुन्हेगार संतोष जाधव आणि त्याचा साथीदार वाडीया कॉलेजकडून कोरेगाव पार्क कडे जाणाऱ्या रस्त्याच्याकडेल उभे आहेत. माहिती मिळताच पोलीसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांची झाडाझडती घेतली असता २५ ग्रॅम वजनाची सोन्याची पाटली व कटर असा एकूण १ लाख २० हजार २५ रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांना पोलीसांनी अटक केली आहे.