Crime News: बिल्डरने रहिवाशांच्या अंगावर घातला जेसीबी

वादातील जमिनीवरील गवत काढत असलेल्या बिल्डर आणि त्याच्या मुलांना थांबविल्यामुळे या तिघांनी मिळून सोसायटी रहिवाशांना क्रिकेट बॅट, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. तसेच जेसीबी थेट अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करताना अश्लील शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार सूस परिसरात घडला आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

बिल्डरने रहिवाशांच्या अंगावर घातला जेसीबी

वादग्रस्त जमिनीवरुन बॅट, दांडक्याने मारहाण, महिलांना शिवीगाळ

वादातील जमिनीवरील गवत काढत असलेल्या बिल्डर आणि त्याच्या मुलांना थांबविल्यामुळे या तिघांनी मिळून सोसायटी रहिवाशांना क्रिकेट बॅट, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. तसेच जेसीबी थेट अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करताना अश्लील शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार सूस परिसरात घडला आहे. या सर्व प्रकाराचे व्हीडीओ रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, बिल्डरला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी (२ ऑक्टोबर) दुपारी तीर्थ टॉवर सूस येथे घडली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने आम्ही वाचल्याचे रहिवासी यांचे म्हणणे आहे.

यशवंत शंकरराव निम्हण असे अटक करण्यात आलेल्या बिल्डरचे नाव असून, त्याची दोन मुले ऋषिकेश यशवंत निम्हण, अभिषेक यशवंत निम्हण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ नागनाथ गुंड (वय ४४, रा, सूस) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याचबरोबर भरत कडेदिन (वय ४८) यांनीही याबाबत एक स्वतंत्र तक्रार दिली आहे. बिल्डर त्याची मुले आणि अन्य काही लोक हे तीर्थ टॉवर या सोसायटी लगत असलेले गवत काढत होते. त्यांना ते काम थांबवण्यास सांगितले असता आरोपींनी भरत पासी यांच्या अंगावर जेसीबी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. गुंड यांना बेदम मारहाण केली. हे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या वासू कुनीचेट्टी यांनाही बेदम मारहाण केली.

बिल्डर निम्हण यांनी रहिवाशांना चक्क दंडुक्याने मारहाण केली. त्याचबरोबर महिलांसमोर अश्लील शिवीगाळ केली. या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सूस येथील लगतच्या सोसायटीधारकांसोबत सुरू असलेल्या जमिनीच्या वादातून हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

तीर्थ डेव्हलपर्स या बिल्डरने तीर्थ टॉवर्समध्ये इमारती उभारल्या. तिथं घरं घेताना बिल्डरने रहिवाशांसाठी वेगवेगळ्या सोयी-सुविधा देणार असल्याचं दाखवलं. त्यात गोल्फ कोर्टचा समावेश होता, तसेच इंटर्नल रोडही दिला. मात्र कालांतराने बिल्डर यशवंत निम्हण यांनी गोल्फ कोर्ट आणि इंटर्नल रोडवर दावा सांगितला. त्यामुळं तीर्थ डेव्हलपर्स आणि निम्हण यांनी संगनमत केल्याचा आरोप रहिवासी करतात. गेल्या पाच वर्षांपासून हा वाद सुरू असून न्यायालयात सुनावणीही चालू आहे. मात्र निम्हण वेळोवेळी तीर्थ टॉवर्सच्या समोर येऊन राडा घालतात, असा इथल्या रहिवाशांचा आरोप आहे.

सूस येथील तीर्थ टॉवर्सच्या लगत यशवंत निम्हण या बिल्डरची साईट सुरू आहे. मात्र, खासगी रस्त्याची जागा नेमकी कोणाची, यावरून न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अशातच बुधवारी बिल्डर जेसीबी घेऊन तीर्थ टॉवर्स बाहेर पोहोचले. मग तीर्थ टॉवर्सचे रहिवासी बाहेर आले अन् वादाला तोंड फुटले. त्यावेळी, बिल्डर निम्हण यांनी थेट दंडुक्याने काहींना मारहाण केली, अगदी महिलांदेखत अश्लील शिवीगाळही केली. नंतर हिंजवडी पोलिसांना या राड्याची कल्पना दिली गेली. पोलीस घटनास्थळी येताच प्रकरण थंडावले. नंतर बिल्डरला घेऊन पोलीस येत असताना रहिवाशांनी गाडीची डिकी तपासण्याचा आग्रह धरला. पोलिसांनी डिकी तपासली असता लाकडी दांडके आणि बॅट्स आढळल्या आहेत. या घटनेनंतर यशवंत निम्हण यांना अटक केली असून, हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest