Crime : 'मुंबई क्राईम ब्रांच'च्या नावाने गंडा; दोन प्रकरणांमध्ये ३० लाख लंपास

नागरिकांना फोन करून त्यांच्या नावाने विदेशात जात असलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज (drug)सापडल्याची बतावणी करीत 'मुंबई क्राईम ब्रांच'च्या (Mumbai Crime Branch) नावाने ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रकार वाढत चालले आहेत.

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

सिंहगड रोड आणि येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : नागरिकांना फोन करून त्यांच्या नावाने विदेशात जात असलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज (drug)सापडल्याची बतावणी करीत 'मुंबई क्राईम ब्रांच'च्या (Mumbai Crime Branch) नावाने ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. पुण्यात एकाच दिवसांत सिंहगड रोड(Sinhagad Road Police) आणि येरवडा पोलीस (Yerwada Police) ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन घटनांमध्ये मिळून ३० लाखांची रक्कम ऑनलाईन लंपास करण्यात आली. (Pune Crime News)

सिंहगड रोड पोलीस ठाण्यात रत्नदीप पुरुषोत्तम ब्राह्मणकर (वय ३७, रा. बालार्क आर्केडिया, राजयोग सोसायटी, वडगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात मोबाईल क्रमांक धारकाने ब्राह्मणकर यांच्याशी संपर्क साधला. त्याच्या मोबाईल डीपीवर मुंबई पोलिसांचा लोगो होता. त्याने मुंबईच्या सायबर क्राईम ब्रांचमधून बोलत असल्याची बतावणी केली. ब्राम्हणकर यांच्या नावाने 'मुंबई ते तैवान' असे पार्सल जात असून हे पार्सल आम्ही पकडल्याचे त्याने सांगितले. त्यामध्ये मुदत संपलेले पारपत्र, एसबीआयचे क्रेडीट कार्ड याच्यासोबत  ४५० ग्रॅम ड्रग्ज सापडल्याची बतावणी केली. त्यांना कारवाईची भीती दाखवत खाते पडताळणी करावी लागेल असे सांगितले. घाबरलेल्या ब्राह्मणकर यांनी त्यांच्या खात्याची सर्व माहिती आरोपींना दिली. या माहितीचा वापर करीत आरोपींनी त्यांना वेळोवेळी फोन करून विविध कारणे देत खात्यामधून २७ लाख ९८ हजार ७७६ रुपये वर्ग करण्यास भाग पाडले. घाबरलेल्या ब्राह्मणकर यांनी पैसे पाठवले.

मात्र, आणखी पैशांची मागणी झाल्यानंतर त्यांना आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. त्यांनी यासंदर्भात सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला. त्या अर्जाचा तपास करून हा गुन्हा सिंहगड रोड पोलिसांकडे तपासासाठी सोपविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजूरकर करीत आहेत. याबाबत निरीक्षक राजूरकर म्हणाले, की हा गुन्हा सायबर पोलिसांकडून तपास करून सिंहगड रोड पोलिसांकडे पाठविण्यात आला आहे. याबाबत तपास करून पुढील कार्यवाही केली जाईल. सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेत. ऑनलाइन फ्रॉडला सर्वाधिक सुशिक्षित आणि उच्च पदस्थ बळी पडत आहेत. याविषयी आम्ही सोसायटी स्तरावर जाऊन देखील जनजागृती करीत आहोत. नागरिकांनी देखील काळजी घ्यावी, असे राजूरकर म्हणाले.

तर, येरवडा पोलीस ठाण्यात, अज्ञात मोबाईलधारक, स्काईप आयडी धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अभिषेक जॉयल ठक्कर (वय ३४, रा. न्याती एन्वाटेन, वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १ ऑक्टोबर २०२३ रोजी ऑनलाइन घडला. आरोपींनी ठक्कर यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला. मुंबईच्या फेडेक्स कंपनीचे  जयदीप राजपूत आणि मुंबई क्राईम ब्रांचचे अधिकारी नरेश गुप्ता बॅनर्जी बोलत असल्याचे सांगितले. त्यांना विश्वास बसत नसल्याने आरोपींनी त्यांना मोबाईलवर खोटे ओळखपत्र आणि खोटी कागदपत्रे पाठविली. ठक्कर यांच्या नावाने मुंबईवरुन थायलंडला फेडेक्स पार्सल पाठविले असल्याची बतावणी केली. त्यांना अटक करण्याची भीती दाखवीत सर्व केसेस क्लिअर करण्यासाठी एनओसी सर्टिफिकेट देतो असे सांगितले. त्यांच्याकडून भुलथापा देत वेळोवेळी ३ लाख २६ हजार रुपये बँक खात्यावर वर्ग करण्यास सांगत फसवणूक केली. या गुन्ह्याचा पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest