महावितरण कर्मचाऱ्याच्या अंगावर कुत्री सोडणाऱ्याला दणका, न्यायालयाने अटकपुर्व जामीन फेटाळला
वीजबिलांच्या थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित केल्याच्या रागातून डेक्कन येथील दोन जणांनी महावितरणच्या दोन महिला तंत्रज्ञांना सुमारे दोन तास डांबून ठेवले होते. तसेच अंगावर कुत्रे सोडल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांच्या न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे.
ललित बोदे (रा. सरस्वती अपार्टमेंट, प्रभात रोड, डेक्कन) असे अटकपूर्व जामीन फेटाळलेल्याचे नाव असून, तो शासकीय कर्मचारी आहे. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या ३५ वर्षीय वरिष्ठ तंत्रज्ञ महिलेने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. २७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला होता.
याबाबत माहिती अशी की, घटनेच्या दिवशी त्या सहकारी महिलेबरोबर प्रभात रस्त्यावरील सरस्वती अपार्टमेंटमधील सदनिका क्र. ३०१ चे वीजबिल थकल्याने त्याच्या वसुलीसाठी गेल्या होत्या. यावेळी, वीजपुरवठा बंद केल्याच्या कारणावरून ललित बोदे व त्यांच्या पत्नीने अर्वाच्य भाषे उद्धट बोलून अंगावर कुत्रे सोडले. तसेच जिन्यामध्ये डांबून ठेवत सरकारी कामात अडथळा आणल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी बोदे याने न्यायालयात अर्ज केला. मात्र, न्यायालयाने अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे, बोदे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.