गंभीर गुन्ह्याचा कट फसला, देशी पिस्टलसह पोलीसांनी तीघांना केली अटक
माथाडीचे कामावरुन झालेल्या वादातून ठराविक उद्देश साध्य करण्याचे हेतूने आलेल्या तीन जणांना पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ०५ देशी बनावटीचे पिस्टल आणि ०२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे आरोपींचा गंभीर गुन्ह्याचा कट फसला आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड खंडणी विरोधी पथकाने २४ जून रोजी केली आहे.
किशोर बापू भोसले (वय ३१, रा. पुनावळे गावठाण, ता. मुळशी, जि. पुणे), अमित दत्तात्रय पाटुळे (वय २३, रा. शिंदेवस्ती चौक, रावेत, पुणे) आणि अमोल उर्फ धनज्या गजानन गोरगले (वय ३४, रा. पुनावळे, गावठाण, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. यातील आरोपी अमोल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्यात दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत करणे असे गुन्हे दाखल आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किशोर भोसले आणि अमित पाटुळे हे दोघे गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने पुनावळे येथील स्मशान भुमी येथे येणार असून, त्यांचेकडे पिस्टल आहे. अशी माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीसांनी मिळाली होती. त्यानुसार २४ जून रोजी पोलीसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ५ देशी बनावटीचे पिस्टल आणि ०२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. तसेच त्यांच्यावर रावेत पोलीस ठाण्यात कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
जप्त करण्यात आलेल्या पिस्टल आणि काडतूसांबाबत पोलीसांनी आरोपींकडे चौकशी केली. तपासामध्ये पिस्टल आणि काडतुसे सराईत गुन्हेगार अमोल याच्याकडून आणले असल्याची कबूली आरोपींनी दिली. त्यानंतर पोलीसांनी आरोपी अमोलला देखील अटक केली आहे. अमोलला अटक केल्यानंतर पोलीसांनी अधिक चौकशी केली. यावेळी माथाडीचे कामावरुन झालेल्या वादातून ठराविक उद्देश साध्य करण्याच्या हेतूने आरोपी अमोल गोरगले याने साथीदारांसाठी पिस्टल व राऊंड आणले असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खंडणी विरोधी पथक करीत आहे.