Pune Crime News : रेल्वे प्रवाशाच्या मृत्यूचा तपास सीआयडीकडे

पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या 'डेक्कन क्वीन' मध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या प्रवाशाच्या मृत्यूचा तपास महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) केला जाणार आहे. लोहमार्ग पोलिसांकडून हा तपास 'सीआयडी' कडे वर्ग करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sun, 8 Oct 2023
  • 02:48 pm
Pune Crime News

रेल्वे प्रवाशाच्या मृत्यूचा तपास सीआयडीकडे

'आरपीएफ' अधिकाऱ्यांच्या ताब्यात असताना झाला होता मृत्यू; लोहमार्ग पोलिसांनी नोंदवलेल्या अकस्मात मृत्यूच्या गुन्ह्याची होणार तपासणी

लक्ष्मण मोरे

पुणे-मुंबई दरम्यान (Pune Crime News)धावणाऱ्या 'डेक्कन क्वीन' (Deccan Queen)मध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या प्रवाशाच्या मृत्यूचा तपास महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (CID) (सीआयडी) केला जाणार आहे. लोहमार्ग पोलिसांकडून हा तपास 'सीआयडी' कडे वर्ग करण्यात आला आहे. हा प्रवासी 'आरपीएफ' अधिकाऱ्यांच्या ताब्यात असताना त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या प्रवाशाचा मृत्यू कोठडीत झाल्यामुळे तपास 'सीआयडी' कडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेची सविस्तर बातमी 'धास्ती की जबरदस्ती?' या शीर्षकाखाली 'सीविक मिरर'ने सर्वप्रथम दिली होती.

कुलतरणसिंग लालचंद सेठी (वय ६६, रा. बी ६, गुरूतेगबहादूर सोसायटी, औंध रोड, रेंजहिल्स, खडकी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या मृत्यू प्रकरणी पुणे लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. लोहमार्ग पोलिसांनी घटनेच्या दिवशी 'डेक्कन क्वीन' मधून प्रवास करीत असलेल्या प्रवाशांचे, कारवाईला गेलेल्या आरपीएफ जवानांचे आणि सोबत असलेल्या तिकीट तपासनिसांचे जबाब नोंदवले आहेत. दरम्यान, या घटनेमधील गांभीर्य वाढल्याने हा तपास 'सीआयडी' कडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही प्रवासी 'डेक्कन क्वीन' मध्ये दारू पिऊन येत असल्याच्या तसेच बोगीमध्ये जुगार खेळला जात असल्याच्या तक्रारी थेट महाराष्ट्र शासनाच्या गृह (परिवहन) विभागापर्यंत पोचल्या होत्या.  गृह (परिवहन ) विभागाने याबाबत मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या महाव्यवस्थापकांना माहिती कळवून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक कार्यालयाकडून या संदर्भात रेल्वे सुरक्षा दलाच्या वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्तांना आवश्यक कारवाई करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करून सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार 'डेक्कन क्वीन' मध्ये 'रेल्वे प्रोटेक्शन फोर्स' (आरपीएफ) आणि मध्य रेल्वेकडून चार तिकीट तपासणीस (टीसी) यांची नेमणूक करण्यात आली होती.

हे संयुक्त पथक 'डेक्कन क्वीन' मधील डी/७ कोचमध्ये तपासणी करीत होते. त्यावेळी सीट क्रमांक ३७, ३८ आणि ३९ मध्ये बसलेले प्रवासी पत्ते खेळत असल्याचे आढळून आल्याचा दावा सेंट्रल रेल्वेने केला आहे. पथकाला पाहताच त्यांनी खिडकीमधून दारूची बाटली फेकून दिली. त्यांच्याकडे योग्य सीझन तिकीट होते. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करण्यात आलेली नव्हती, असे देखील मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. दरम्यान, याच कोचमधून ऑटोमोबाईलचा व्यवसाय असलेले सेठी मुंबईच्या ओपेरा हाऊस मार्केटमध्ये ऑटोमोबाईल साहित्य खरेदी करण्यासाठी जात होते. सेठी यांच्याकडे चौकशी आणि तपासणी सुरू होती. 'आरपीएफ' ने त्यांना ताब्यात घेतल्याचे काही प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यावेळी पोलिसांच्या भीतीने सेठी यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना दरदरून घाम फुटला. छातीमध्ये त्रास सुरू झाला. काही कळायच्या आताच ते जागेवर कोसळले. ते बेशुद्ध पडल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. दरम्यान, बोगीमधून प्रवास करीत असलेल्या प्रवाशांमध्ये डॉक्टर असलेल्या प्रवाशांनी त्यांना तपासले. त्यांना तत्काळ 'सीपीआर' देण्यात आला. मात्र, त्याचा परिणाम झाला नाही. आरपीएफच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांच्या भडिमाराने हा प्रवासी घाबरल्याचे काही प्रवाशांनी सांगितले.

दरम्यान, सेठी यांचे शवविच्छेदन नायब तहसीलदारांच्या समक्ष ससून रुग्णालयात करण्यात आले होते. 'डेक्कन क्वीन' मध्ये घडलेल्या या प्रकाराची माहिती काही प्रवाशांनी तसेच पोलिसांनी लोणावळा रेल्वे स्थानकाचे उप स्थानक प्रबंधकांना कळविली होती.  या उपप्रबंधक कार्यालयाने लोणावळा लोहमार्ग पोलिसांना (जीआरपी) याबाबत कळवले. त्यांनी सेठी यांच्यावर उपचार करण्याबाबत लेखी मेमो दिल्यानंतर लोणावळा लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफने त्यांना लोणावळ्यातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले होते. परंतु, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.  पुणे लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान झालेल्या जाब-जबाबांमध्ये सेठी यांचा मृत्यू ते 'आरपीएफ' च्या ताब्यात असताना झाल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांच्या ताब्यात असताना झालेल्या मृत्यूचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे द्यावा लागतो. त्यानुसार, हा गुन्हा 'सीआयडी'कडे वर्ग करण्यात आला आहे.

'डेक्कन क्वीन' मध्ये आरपीएफ आणि टीसी यांच्या चौकशीदरम्यान प्रवाशाच्या झालेल्या मृत्यूचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. हा प्रकार 'डेथ इन कस्टडी' चा असल्यामुळे या पुढील तपास 'सीआयडी' मार्फत केला जाणार आहे. आम्ही हा गुन्हा त्यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

- श्रीकांत धीवरे, 

पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे

लोहमार्ग पोलिसांनी दाखल केलेला अकस्मात मृत्यूचा गुन्हा तपासासाठी सीआयडीकडे वर्ग झाला आहे. आम्ही कागदपत्रांची पडताळणी सुरू केली असून त्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे. ही 'डेथ इन कस्टडी' असल्याने बारकाईने तपास करण्यावर भर देण्यात येईल. तपासाअंती याबाबत स्पष्टपणे सांगता येईल. 

- दिनेश बारी, 

अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest