PUNE CRIME NEWS: घरावरील काळी जादू काढण्याच्या बहाण्याने फसवणूक; गुंगीचे औषध पाजत मायलेकीचे काढले विवस्त्र फोटो

घरावर असलेली काळी जादू नष्ट करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन मांत्रिकांनी घरामध्ये घुसून मायलेकींना गुंगीचे औषध देऊन नग्नावस्थेतील छायाचित्र काढण्यात आल्याचा आणि त्याआधारे ब्लॅकमेल करीत १५ लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

संग्रहित छायाचित्र

घरामध्ये घुसलेल्या दोन मांत्रिकांचे कृत्य

घरावर असलेली काळी जादू नष्ट करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन मांत्रिकांनी घरामध्ये घुसून मायलेकींना गुंगीचे औषध देऊन नग्नावस्थेतील छायाचित्र काढण्यात आल्याचा आणि त्याआधारे ब्लॅकमेल करीत १५ लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  

हा प्रकार १४ डिसेंबर २०२३ रोजी वानवडी रहेजा गार्डन सोसायटीत घडला. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी भादंवि तसेच आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कृष्णनारायण तिवारी (वय ३०, रा. शक्तीनगर, गोंडा, उत्तर प्रदेश) आणि अंतीमा कृष्णनारायण तिवारी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी २८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची ओळख आहे. फिर्यादीला येत असलेल्या अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी तिवारी यांनी फिर्यादीला भूलथापा दिल्या. फिर्यादीच्या घरावर काळी जादू झाल्याचे सांगितले. त्यांच्या घरावरील काळी जादू नष्ट करतो, अशी या दोघांनी बतावणी केली. त्याकरिता फिर्यादीला घरामध्ये पूजा करावी लागेल असे सांगितले. त्यानुसार, फिर्यादीच्या घरी पूजा करण्याचे ठरले. ही पूजा करण्यासाठी कृष्णनारायण आणि अंतीमा यांना बोलावण्यात आले. पूजा करीत असताना फिर्यादी महिलेला आणि तिच्या लहान मुलीला पिवळ्या रंगाचे कडू चव असलेले गुंगीकारक औषध प्यायला दिले. हे औषध प्यायल्याने या दोघींना गुंगी आली. त्या अवस्थेत त्यांच्या अंगावरील कपडे काढण्यात आले. या दोघींचे अंतर्वस्त्रातील फोटो काढण्यात आले. हे फोटो फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर पाठविण्यात आले.

त्यानंतर, फिर्यादीचा मोबाईल आरोपी कृष्णनारायण याने स्वत:च्या फोनमध्ये स्कॅन करून घेतला. फिर्यादीच्या मोबाईलवर पाठवलेले फोटो त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील नंबरवर पाठविण्याची धमकी दिली. या फोटोंच्या आधारे फिर्यादीला ब्लॅकमेल करण्यास आरोपींनी सुरुवात केली. तिच्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी करण्यात आली. पैसे नाही दिले तर फिर्यादीला व तिच्या मुलीला ठार मारण्याची धमकी दिली.

फिर्यादीकडून वेळोवेळी आरटीजीएस, फोन पे, सीडीएम मशिनद्वारे रक्कम ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. तसेच, तिच्या घरामधून सोन्याचे दागिने व कॅमेरा संगनमत करून चोरून नेल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. याबाबत ‘सीविक मिरर’ला माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे म्हणाले, ‘‘हा गुन्हा स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल करून तो वानवडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिलेविरुद्धदेखील अनेक तक्रार अर्ज वानवडी पोलिसांकडे आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.’’

Share this story

Latest