रेल्वेतून फटाके घेऊन जाणे पडले महागात, एकाला अटक
रेल्वेतून फटाके घेऊन प्रवास करणे एकाला चांगलेच महागात पडले आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या श्वान पथकाने एकाला फटाक्यांसह अटक केली आहे. रेल्वेतून जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान होऊ शकणाऱ्या वस्तू घेऊन जाण्यास मनाई आहे. मात्र, असे असतानाही फटाके घेऊन प्रवास केल्यामुळे तरुणाला अटक करण्यात आली आहे.
रेल्वे पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार गाड़ी क्रमांक ११४११ परळी – मिरज पॅसेंजर मिरज स्थानकावर पोहोचली असता तेथे रेल्वे सुरक्षा दलाचे पथक नियमित तपासणी करीत होते. यावेळी गाडीतून प्लॅटफॉर्मवर उतरलेल्या प्रवाशांपैकी एक जण कापडी पिशवीत काही वस्तू घेऊन खाली उतरला. तेव्हा श्वान चेतक याने त्या कापडी पिशवीचा वास घेतला आणि त्याच्या हँडलर जवानाला काही संशयास्पद वस्तू असल्याचा इशारा केला.
प्रवाशाकडे चौकशी केली असता त्याने पिशवीत काही फटाके घेऊन प्रवास केल्याचे कबूल केले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला ठाण्यात नेऊन त्याचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर रेल्वे कायद्याच्या विभिन्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, प्रवासादरम्यान स्टोव्ह, गॅस सिलिंडर, कोणतेही ज्वलनशील रसायन, फटाके, ऍसिड घेऊन प्रवास करू नये तसेच प्रवासादरम्यान धूम्रपान टाळावे कारण तसे केल्यास जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे या गोष्टी टाळाव्यात, अशी विनंती रेल्वे प्रशासनातर्फे सर्व रेल्वे वापरकर्त्यांना करण्यात आली आहे.