वाघोलीतील घरफोडीतील चोरट्याला अवघ्या २४ तासात अटक, गुन्हे शाखा युनिट ६ कामगिरी
पुण्यातील वाघोली परिसरात घरफोडी करून पसार झालेल्या दोन चोरट्यांना अवघ्या २४ तासात पोलीसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि वेगवेगळ्या कंपनीचे ०५ मोबाईल फोन असा एकूण ३ लाख ४७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने केली आहे.
ओंकार सुरेश गोसावी (वय २१, रा. सहारा प्रेस्टिजजवळ, जगदाळे निवास, भेकराईनगर, फुरसुंगी, पुणे) आणि एक अल्पवयीन मुलगा अशी अटक कऱण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ सप्टेंबर रोजी वाघोलीतील एका घरातील घरफोडी प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात कलम ४५४, ४५७ आणि ३८० नुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. या प्रकरणाच्या अनुशंगाने तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलीसांना खबऱ्याद्वारे माहिती मिळाली की चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट येथे थांबलेला असून त्याच्याकडे नंबर नसलेली दुचाकी आहे.
माहिती मिळाताच सापळा रचून पोलीसांनी आरोपी ओंकार गोसावीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे वरील गुन्ह्याबाबत चौकशी केली. सुरूवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र, पोलीसांनी विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता आपण एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने चोरीचा गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली. पोलीसांनी आरोपी ओंकार गोसावीसह जावून शोध घेतला असता अल्पवयीन चोरटा फाटे कॉलनी येथे रस्त्याने पायी चालत जाताना मिळून आला. त्याच्या ताब्यता घेऊन सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि वेगवेगळ्या कंपनीचे ५ मोबाईल फोन असा एकूण ३ लाख ४७ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, भैरवनाथ शेळके, पोलीस हवालदार मच्छिंद्र वाळके, पो ना विठ्ठल खेडकर, संभाजी सकटे, रमेश मेमाने, नितीन मुंढे, प्रतीक लाहीगुडे, प्रमोद मोहिते, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश टिळेकर, अशफाक मुलाणी, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे, सुहास तांबेकर यांच्या पथकाने केली.