Bhosari : भोसरीत दादागिरी वाढली, बिल्डरनंतर आता अधिकाऱ्याला आमदार समर्थकाची मारहाण

काही दिवसांपूर्वी व्यावसायिक चर्चेसाठी महापालिका मुख्य भवनात आलेल्या बिल्डरला लाथा-बुक्क्यांनी आमदार समर्थक नगरसेविकेच्या पतीने मारहाण केली होती. याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते.

 Bhosari : भोसरीत दादागिरी वाढली, बिल्डरनंतर आता अधिकाऱ्याला आमदार समर्थकाची मारहाण

संग्रहित छायाचित्र

महापालिका कर्मचाऱ्यांनी उद्धट वर्तन केल्याबाबत त्याला नोटीस दिल्याने भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकाने सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्याच्या कानशिलात लगविल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. काही दिवसांपूर्वी व्यावसायिक चर्चेसाठी महापालिका मुख्य भवनात आलेल्या बिल्डरला लाथा-बुक्क्यांनी आमदार समर्थक नगरसेविकेच्या पतीने मारहाण केली होती. याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते.

दरम्यान, महापालिकेतील सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्याच्या कानशिलात लगविल्याप्रकरणी भाजप नगरसेविकेचा पतीसह तिघांवर सरकारी कामात अडथळा आणून, सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण तसेच शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (५ डिसेंबर) दुपारी बारा वाजताच्या सुमारास पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ई क्षत्रिय कार्यालयात ही घडली. तर याबाबत गुन्हा दाखल करायला पोलिसांना आठ तासांहून अधिक वेळ लागला आहे.

राजेश नंदलाल भाट (वय ५४, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शंकर मुरलीधर सोनवणे (वय ३२, रा. बोपखेल गावठाण), संतोष लांडगे (वय ४५), एक अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश भाट हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ई क्षेत्रीय कार्यालयात सहाय्यक आरोग्य अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांनी शंकर सोनवणे यास विनापरवाना गैरहजर आणि उद्धट वर्तनाबाबत नोटीस बजावली होती. त्या कारणावरून त्याने माजी नगरसेविकेचे पती संतोष लांडगे आणि अन्य साथीदारांना सरकारी कार्यालयात जाऊन राजेश भाट यांना शिवीगाळ केली. तसेच भाट यांना मारहाण करण्यासाठी आरोपी अंगावर धावून गेले. अनोळखी व्यक्तीने भाट यांच्या कानशिलात लगावली.

भाट यांना मारहाण करत त्यांच्या कार्यालयात ओढून नेले. शंकर सोनवणे यांनी तुझ्या नावाने आत्महत्या करून तुझी नोकरी घालवतो अशी धमकी दिली. संतोष लांडगे हे भाजपच्या माजी नगरसेविका सारिका लांडगे यांचे पती आहेत.

यापूर्वी ऑक्टोबर महिना अखेरीस जमिनीच्या वादातून आमदार महेश लांडगे यांचे कार्यकर्ते आणि पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांचे पती नितीन बोऱ्हाडे यांनी जमीन व्यवहारातील वादातून उद्योजक नरेश पटेल यांना महापालिका आवारातच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतर आता आमदार लांडगे यांनी शहरातील पटेल समाजाची माफी मागितली होती. मात्र, त्यानंतरही आमदार समर्थकांची दादागिरी कमी झालेली नाही. महापालिका कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत नाराजी पसरली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest