प्रेयसीबरोबर फिरत असल्याच्या संशयातून निर्घृण खून करणाऱ्यास आजीवन कारावास
नितीन गांगर्डे
प्रेयसीबरोबर फिरत असलेल्या तरुणाचा निर्घृण खून करणाऱ्या एकास न्यायालयाने जन्मठेप आणि एक लाख रुपयांच्या आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे. २०१८ साली काळीज पिळवटून टाकणारी मन सुन्न करणारी ही हत्त्या झाली. कोंढवा बुद्रुक येथील पुण्यधाम आश्रमाच्या दक्षिण दिशेला पिसोळीगावच्या शिवेवर शीर छाटलेला आणि शरीरावर जखमा असलेला अर्धनग्न मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. याप्रकरणाचा तपास करून पोलिसांनी आरोपी निजाम असगर हाश्मी याला अटक केली होती. न्यायालयाने त्याला खून प्रकरणी दोषी ठरवून शिक्षा ठोठावली आहे.
सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी ही शिक्षा सुनावली आहे. रमजान ईदच्या दिवशी शिरखुर्मा खाण्याच्या बहाण्याने तरुणाला बोलावून, त्याचा खून करून, अर्धनग्न अवस्थेत मृतदेह निर्मनुष्य स्थळी टाकून दिला होता. उमेश भीमराव इंगळे असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक बसवराज उजने यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात सरकार मार्फत १९ जून २०१८ रोजी फिर्याद दिली होती.
१९ जून रोजी हा शीर नसलेल्या अर्धनग्न अवस्थेत मृतदेह पिसोळीगाव शिवेवर पोलिसांना आढळून आला होता. तेथील एका खड्ड्यात पडलेला होता. त्यावर हाफ निकर, शरीरावरील ठिकठिकाणची त्वचा निघालेली होती. पोटावर आणि हाताच्या मनगटावर जखमेची खून होती. घटनास्थळाच्या ५० फुटांतरावरील एका झाडाखाली रक्ताने माखलेला व फाटलेले टीशर्ट, त्याच्या काही अंतरावर एक सॅंडल, पोलिसांना मिळून आले होते. धारदार हत्याराने पोटावर, हातावर वार करून खून केला होता. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने अंगावरील कपडे काढले होते. तसेच मृतदेहाचे शीर कापून धडापासून वेगळे करून लांब केले होते. याप्रकरणी भारतीय दंड संहितेतील कलम ३०२, २०१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशी माहिती सरकारमार्फत फिर्याद देणारे पोलीस कर्मचारी बसवराज उजने यांनी मिररशी बोलताना दिली.
उमेश भीमराव इंगळे (२०)असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी अतिशय कुशलतापूर्वक तपास करत मृत व्यक्तीच्या कपड्यावरून तो व्यक्ती नेमका कोण आहे याचा तपास लावला. पोलिसांनी निजाम आसगर हाशमी (१८) अण्णांभाऊ साठे नगर ,इंदिरानगर बीबवेवाडी याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. या चौकशी दरम्यान त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी निजाम आसगर हाशमी याला मृत उमेश इंगळे याचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आले.
अटक आरोपी निमाज आसगर हाश्मी याने त्याची प्रेयसी गितांजली सोबत उमेश हा नेहमी फिरत असतो, तिच्या अंगाला चिकटतो, लगट करतो यावरून हाश्मी आणि उमेश यांची भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरुन हाश्मीने उमेशला ठार मारण्याचे नियोजन केले. त्याच्याकडे असलेल्या लोखंडी सत्तुरला धार लावली. उमेशला रमजान ईदच्या दिवशी शीरखुर्मा पाजण्याचा बहाण्याने हाश्मी बिबवेवाडी येथील अप्पर रोड वरील बिलाल मशिदीजवळ घेऊन गेला. तेथे उमेश शीरखुर्मा पीत असताना हाश्मीने त्याच्या मानेवर लोखंडी सत्तूरने वार करून खून केला. उमेशची ओळख पटू नये यासाठी त्याने मूत्रदेहाचे मुडके आणि लिंग छाटले. ते एका पिशवीत भरले त्यासोबत सत्तूर, मृतव्यक्तीचे पॅनकार्ड, त्याच्या कंपनीचे ओळखपत्र पिशवीत भरून स्वारगेट येथील पीएमटी डेपोच्या मागील कॅनाल मध्ये टाकले. अशी माहिती या गुन्ह्याचे तपासाधिकारी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे यांनी मिररशी बोलताना दिली.
तपासाधिकारी संतोष शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत उमेश हा मुलाचा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी होता. नोकरी निमित्त तो पुणे शहरात आला होता. खुनी हाश्मी याची प्रेयसी ही मृत उमेशची चुलत बहीण आहे. हाश्मीने खून केल्यानंतर दोन दिवसांत मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात यश मिळवले. मात्र मृतदेहाचे शीर शोधण्यात बरीच कसरत करावी लागली. आम्ही सहा दिवस त्याचा शोध घेत होतो. कालव्याचे पाणी बंद करून आमच्या टीमने शीर आणि खुनात वापरलेल्या हत्याराचा शोध घेतला. याप्रकरणात फिर्यादी, शवविच्छेदन करणारे डॉक्टर, तपास पथकातील कर्मचारी अशा अनेकांच्या न्यायालयात साक्षी झाल्या. माझीही तीन वेळा न्यायालयात साक्ष झाली. अखेरीस गुन्हेगारास न्यायालयाने शिक्षा ठोठावून न्याय दिला.
कोंढवा पोलीस ठाण्यातील तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे ( सद्या सहाय्यक पोलीस निरीक्षक फरासखाना पोलीस स्टेशन) यांनी याप्रकरणाचा तपास केला होता. कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संतोष सोनावणे यांनी प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहिले. न्यायालयीन कामकाजात उपनिरीक्षक समाधान मचाले, सहायक फौजदार महेश जगताप, शिपाई अंकुश केंगले यांनी सहाय्य केले. या खटल्यात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील ॲड. नामदेव तरळगट्टी यांनी काम पाहिले. सरकार पक्षाकडून २४ साक्षीदारांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या होत्या. आरोपीकडून खून करण्यासाठी वापरलेला सत्तुर, तसेच उमेश इंगळेचे पॅनकार्ड जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी न्यायालयाने निमाज आसगर हाश्मी यास आजीवन कारावास आणि १ लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास त्याची शिक्षा सहा महिन्यांनी वाढणार आहे.