बोपोडी ‘हीट अँड रन’ प्रकरण: अपघातापूर्वी आरोपीची दारूपार्टी

बोपोडी येथे पोलीस कर्मचाऱ्याचा बळी घेणाऱ्या अपघातासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. आरोपीच्या कारला दुसऱ्या कारने ओव्हरटेक केले होते. याचा राग आल्याने मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपीने त्या कारला मागे टाकण्यासाठी त्याची गाडी वेगात चालवायला सुरुवात केली.

Bopodi Hit and Run, Policeman Died, Samadhan Koli, Sanjog Shinde, Siddharth Raju Kengar

संग्रहित छायाचित्र

बोपोडी ‘हीट अँड रन’ अपघातापूर्वीची माहिती पोलिसांच्या हाती, कारने दुचाकीला धडक देऊन घेतला पोलिसाचा बळी

बोपोडी येथे पोलीस कर्मचाऱ्याचा बळी घेणाऱ्या अपघातासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. आरोपीच्या कारला दुसऱ्या कारने ओव्हरटेक केले होते. याचा राग आल्याने मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपीने त्या कारला मागे टाकण्यासाठी त्याची गाडी वेगात चालवायला सुरुवात केली. प्रचंड वेगात असलेली ही गाडी पुढे जाऊन दुचाकीवरून गस्त घालीत असलेल्या पोलिसांना धडकली. या अपघातात पोलीस हवालदार समाधान कोळी यांचा मृत्यू झाला. आरोपीने या अपघातापूर्वी मित्रांसोबत धानोरी येथे दारूपार्टी केल्याचे समोर आले आहे.

हा अपघात सोमवारी पहाटे पावणेदोन वाजण्याच्या सुमारास बोपोडी येथील हॅरिस पुलाखाली घडला होता. पोलीस हवालदार समाधान आनंदराव कोळी (वय ४४, रा. बोपोडी, मूळ रा. चोपडा, जळगाव) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पोलिसाचे नाव आहे. पोलीस शिपाई संजोग शाम शिंदे (वय ३५) असे जखमी पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक सिध्दार्थ उर्फ गोट्या राजू केंगार (वय २४, रा. बोपोडी) याला अटक करण्यात आली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद गणपतराव रुईकर (वय ४४) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, मोटार वाहन कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी रॉबिन आठवले आणि सिद्धार्थ लालबिगे या दोघांनादेखील ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे कसून चौकशील सुरुवात करण्यात आली आहे. त्यांच्याकडूनच दारूपार्टीची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या घटनेत पोलीस हवालदार कोळी यांचा जागीच मृत्यू झाला असून, पोलीस शिपाई शिंदे हे जखमी झाले आहेत.

परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी ‘सीविक मिरर’ला दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सिद्धार्थ लालबिगे याचा वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आरोपी सिद्धार्थ केंगार, रॉबिन आठवले, सिद्धार्थ लालबिगे आणि अन्य एकजण असे चार मित्र एकत्र गेले होते. कारमधून हे सर्वजण विश्रांतवाडीमधील धानोरी येथील पोरवाल रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये गेले होते. तेथे चौघांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर त्यांनी एका वाईन शॉपमधून दारू खरेदी केली. ही दारू या सर्वांनी गाडीमध्येच प्यायली. त्यानंतर ते कार घेऊन बोपोडीकडे निघाले होते. मद्यधुंद अवस्थेत असलेला आरोपी सिद्धार्थ केंगार हा गाडी चालवत होता.

हे सर्वजण खडकी परिसरात आले असता पाठीमागून आलेल्या कारने आरोपी चालवत असलेल्या कारला  ओव्हरटेक केले. आपल्याला त्या कारचालकाने खुन्नस दिली, असा विचार त्याच्या डोक्यात आला. त्याने रागाच्या भरात त्या कारला ओव्हरटेक करण्यासाठी गाडीचा वेग वाढवला. त्या गाडीचा पाठलाग सुरू केला. दारूच्या नशेत आरोपी केंगार बेफाम कार दामटवत होता. मात्र, या कारला ओव्हरटेक करणे त्याला शक्य होत नव्हते. प्रचंड वेगात जात असतानाच त्याने रात्रगस्तीवर असलेल्या दुचाकीवरील पोलिसांना पाठीमागून धडक दिली. यावेळी शिंदे पोलीस मोटर चालवत होते. तर, कोळी हे पाठीमागे बसलेले होते. त्यानंतर अवघ्या दहाच मिनिटांनी त्यांच्या दुचाकीला आरोपी केंगार चालवत असलेल्या कारची त्यांना धडक बसली. अतिशय भरधाव आलेल्या या कारने या दुचाकीला एवढी जोरात धडक दिली की पाठीमागे बसलेले कोळी वर उडून कारच्या बोनेटवर आदळले. तर, शिंदे दुचाकीसह घसरत जाऊन रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडले. प्रचंड वेगात असलेल्या या कारने कोळी यांना लांबवर फरफटत नेले. त्यानंतर, कार चालकाने अपघातस्थळी न थांबता साथीदारांसह पळ काढला.
पोलिसांना घटनेसंदर्भात पुरावा मिळू नये म्हणून आरोपीने अपघातग्रस्त कार दुसर्‍या ठिकाणी लपवून ठेवली. त्यानंतर सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. आंबेडकर चौकाकडे जाणार्‍या अंडरपासजवळ पोलिसांचा अपघात झाला असल्याची माहिती तेथून निघालेल्या एका वाहनचालकाने नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर मरिआई गेट पोलीस चौकीचे बीट मार्शल घटनास्थळी पोहोचले. जखमी कोळी आणि शिंदे यांना उपचारासाठी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, कोळी यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, आरोपीसोंबत गाडीमध्ये असलेल्या अन्य तरुणांकडे याविषयी चौकशी सुरू करण्यात आली आहे. गाडीमालक असलेल्या रॉबिन आठवले याच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest