Bhima Shankar Temple : भीमाशंकर मंदिरात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी, ३६ जणांविरोधात गुन्हा दाखल

पूजेच्या अधिकारावरून गुरव समाजातील २ गट आपापसात भिडले होते. यामध्ये अनेकांनी शिवीगाळ देखील केली. हाणामारी केल्याप्रकरणी दोन्ही गटांमधील तब्बल ३६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 17 Oct 2023
  • 05:56 pm
Bhima Shankar Temple: Clash between two groups in Bhima Shankar temple, case filed against 36 people

Bhima Shankar Temple: Clash between two groups in Bhima Shankar temple, case filed against 36 people

पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मंदिरात गुरव समाजाच्या २ गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पूजेच्या अधिकारावरून गुरव समाजातील २ गट आपापसात भिडले होते. यामध्ये अनेकांनी शिवीगाळ देखील केली. हाणामारी केल्याप्रकरणी दोन्ही गटांमधील तब्बल ३६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी शंकर गंगाराम कौदरे (वय ६५, रा. खरोशी, ता खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एका गटातील २१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गोरक्ष यशवंत कौदरे (वय ४०, रा. भिमाशंकर, ता खेड) यांच्या तक्रारीवरुन विरोधी गटातल्या १५ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारे दोन्ही गटातील एकूण ३६ जणांविरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमाशंकर मंदिरात सोमवारी दुपारी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. या दरम्यान, भीमाशंकर मंदिर गाभारा तसेच परिसरात असलेल्या शनी मंदिरात पुजा करण्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला. मात्र, वाद एवढा वाढला की त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. एका गटातील जमावाने पुजेला बसलेल्या पुजाऱ्यांना जबरदस्तीने उठवून येथील ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लाठ्या, काठ्या, लोखंडी पाईप तसेच एकमेकांना खुर्च्या मारून जखमी करण्यात आले. यानंतर दोन्ही गटाकडून दिलेल्या फिर्यादीनंतर ३६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest