सराफांसह चोरीच्या दुचाकी खरेदी करणारे गजाआड
रोहित आठवले
स्वस्तात मिळतोय म्हणून कसलीही शहानिशा न करता माल खरेदी कराल, तर तुम्हाला थेट तुरुंगाची हवा खावी लागेल, कारण मागील काही महिन्यांपासून पोलिसांनी चोरीचा माल खरेदी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला आहे. यातील विशेष बाब म्हणजे काही सराफांवरदेखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे कोणाकडूनही वस्तू खरेदी करीत असताना शहानिशा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही वर्षांपासून चोरीचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यासह पादचाऱ्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून नेणे, तसेच, रात्रीच्या वेळी घरफोड्या करून किमती ऐवज लंपास करण्याचे प्रकारही वरचेवर समोर येऊ लागले आहेत. यातील काही प्रकरणांमध्ये चोरट्यांनी काहीतरी भूलथापा मारून चोरीचा माल सर्वसामान्य नागरिकांच्या गळ्यात मारल्याचे समोर आले आहे, तर काहीजणांनीही स्वस्तात मिळतोय म्हणून चोरीचा माल खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार, पोलिसांनी हेतू तपासून माल खरेदी करणाऱ्यांना थेट गुन्ह्यात आरोपी करण्यास सुरुवात केली आहे.
शहरात चोरलेल्या दुचाकी मराठवाड्यात
पिंपरी-चिंचवड शहरातून चोरलेल्या दुचाकींची मराठवाड्यातील सर्वसामान्य नागरिकांना विक्री होत असल्याचे समोर आले आहे. कागदपत्र नंतर बनवून देतो, असे सांगून चोरटे खेड्यातील नागरिकांना गंडा घालतात. केवळ पाच ते दहा हजारात त्यांना दुचाकींची विक्री केली जाते. काहीजण दुचाकी चोरीची असल्याचे माहिती असूनही धाडस करतात. मात्र, अशा नागरिकांवर थेट गुन्हे दाखल केले जात असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सोन्याची पावती घरी राहिली आहे, वडिलोपार्जित सोने आहे, असे सांगून काहीजण सराफांना गंडवतात. मात्र, काहीजण स्वस्तात मिळत असल्याने कसलीही शहानिशा न करता सोने खरेदी करतात. पोलीस दुकानात आल्यानंतर त्यांची दिशाभूल करण्यासाठी सराफ वेगवेगळ्या क्लूप्त्या लढवतात. मात्र, पोलिसांनी आता उलटतपासणी करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराफांनी पोलिसी खाक्यासमोर आपण चोरीचा माल खरेदी केल्याची कबुली दिली आहे.
१) शहर परिसरात दरोडा, जबरी चोरी आणि घरफोड्या करणाऱ्या केआर टोळीच्या किरण गुरुनाथ राठोड (२६, रा. दिघी), अर्जुन कल्लप्पा सूर्यवंशी (१९, रा. कोरेगाव भीमा), संतोष जयहिंद गुप्ता (१८, रा. खंडोबा माळ, भोसरी) यांना दरोडा विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून बारा लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी चोरलेल्या दागिन्यांची कोरेगाव भीमा आणि परभणी येथे विक्री केली. त्यानुसार, पोलिसांनी संबंधित सराफ व्यावसायिकांना देखील या गुन्ह्यात आरोपी केले आहे. तसेच, दागिन्यांची विक्री करण्यासाठी मदत करणाऱ्या एका साथीदाराला देखील पोलिसांनी गुन्ह्यात घेतले आहे.
२) शहरात चोऱ्या करणाऱ्या महम्मद मुस्ताक सिद्दिकी (२४, रा. लातूर), पांडुरंग बालाजी कांबळे (२३, रा. लातूर), तुषार उर्फ बाळ्या अशोक माने (२४, रा. तळेगाव दाभाडे), अर्जुन संभाजी कदम (२५, रा. लातूर), पक्षाल मनोज सोलंकी (२३, रा. चिंचवड), मुराद दस्तगीर मुलानी (३६, रा. सातारा) यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे पाच लाखांचा ऐवज जप्त करीत पोलिसांनी २२ गुन्ह्यांची उकल केली. या गुन्ह्यांच्या तपासात चोरीचे दागिने विकणारे आणि विकत घेणारे दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
३) चोरलेल्या गाड्यांचे पार्ट खोलून त्याची भंगारात विक्री करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. चोरट्याने ऑटोमोबाईल क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर हा गोरखधंदा सुरू केला होता. आरोपीने ज्यांना पार्टची विक्री केली त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चोरीचा माल खरेदी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अजूनही हे प्रमाण कमी आहे. बहुतांश प्रकरणात चोरी करणाऱ्याला अटक केल्यानंतर माल खरेदी करणाऱ्याकडून चिरीमिरी घेऊन त्याला सोडून दिले जाते. गुन्ह्यांच्या तपासात त्याला याबाबत काहीही माहिती नसल्याचे कागदोपत्री दाखवले जाते. तसेच, काहीजण चोरीचा माल आरोपीच्या ताब्यातून जप्त दाखवतात. मात्र, चोरीचा माल खरेदी करणे बंद झाल्याशिवाय चोऱ्या आटोक्यात येणार नाहीत. त्यामुळे चोरीचा माल खरेदी करणाऱ्यांवरदेखील कडक कारवाई झाली पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
पिंपरी-चिंचवडचे अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी म्हणाले की, गुन्ह्याच्या तपासात चोरीचा माल खरेदी करणाऱ्यांचा सहभाग आढळून आल्याने त्यांच्यावरही प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही वस्तू खरेदी करताना खबरदारी घेण्याची गरज आहे.