महावितरणच्या अभियंता, कर्मचाऱ्यांस मारहाण; दोघांविरुद्ध फौजदारी गुन्हे
वीजबिलांच्या थकबाकीमुळे घरगुती विजेचा पुरवठा खंडित करीत असताना पुणे जिल्ह्याताली कुमशेत येथे महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांविरुद्ध जुन्नर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या मंचर विभागातील जुन्नर उपविभाग अंतर्गत सहायक अभियंता कृष्णा कोळी व रोहिणी आंबेकर तसेच जनमित्र सुखानंद डोणे, अजरुद्दीन शेख, कुंडलिक तळपे व योगेश अंबलकार यांच्याकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान कुमशेत येथील वीजग्राहक बाळासाहेब बबन डोके याच्याकडे वीजबिलापोटी ५ हजार ५९० रुपयांची थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत होती.
मात्र ‘तुम्ही इथे आलेच कसे’ असे म्हणत आरोपी बाळासाहेब बबन डोके व सुधीर बाळासाहेब डोके यांनी मोठ्या आवाजात शिविगाळ सुरु केली. सहायक अभियंता कृष्णा कोळी व जनमित्रांना धक्काबुक्की, मारहाण करीत सरकारी कामात अडथळा आणला. या प्रकरणी महावितरणकडून जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. जुन्नर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास जुन्नर पोलीस करत आहेत.