पुण्यात नोकरीच्या बहाण्याने २८ वर्षीय तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न
शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये उच्चशिक्षित २८ वर्षीय परराज्यातील तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बी.कॉमचे शिक्षण घेतलेल्या तरुणीला नोकरीनिमित्त इंटरव्यूसाठी बोलवून बळजबरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश्वर रेड्डी, चिरागउद्दीन शेख, नूरजहाँ शेख आणि अर्जुन ठाकरे यांच्या विरोधात बलात्काराचा प्रयत्न आणि विनयभंगाचा गुन्हा पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी २८ वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पिंपरी आणि पुण्यात तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पिंपरी पोलिसांकडून गुन्हा लष्कर पोलिसांकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल येथील २८ वर्षीय तरुणी नोकरीच्या शोधात होती. ऑनलाइनद्वारे नोकरी शोधत असताना एका तरुणीचा तिला नंबर मिळाला. तिच्याशी पीडित तरुणीने संपर्क केला. संबंधित मुलीने पुण्यातील हिंजवडीत पीडितेला इंटरव्यूसाठी बोलवले. विश्वासाने ती पुण्यात आली. मात्र हा सगळा प्रकार घडल्यानंतर अखेर तरुणीने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पुणे शहरातील लष्कर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लष्कर पोलीस करत आहेत.