कात्रजमधून तब्बल ५ हजार किलो भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त
पुणे पोलीसांचे गुन्हे शाखेचे पथक आणि दरोडा व वाहन चोरी पथक १ ने मोठी कारवाई केली आहे. कर्नाटकातून शहरात विक्रीसाठी आणलेला सुमारे ४ हजार ९७० किलो भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त केला आहे. पोलिसांनी कात्रज परिसरातून हा साठा जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जुलै रोजी पोलीसांनी संयुक्त कारवाई करत सापळा रचून कात्रज परिसरातून एक टेम्पो ताब्यात घेतला. या टेम्पोची धडती घेतली असती त्यामध्ये ४ हजार ९७० किलो पनीरचा साठा आढळून आला. त्याचे नमुने बाणेर नॅशनल अॅग्रिकल्चरल अॅन्ड फूड अॅनालेसिस अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले.
त्यापैकी काही पिशव्यांमधील पनीरचा अहवाल प्राप्त झाला आहे. पाप्त अहवालानुसार, १० लाख रुपये किमतीचा हा भेसळयुक्त पनीरचा साठा नष्ट करण्यात येणार आहे. तसेच, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.