पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधातेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा, न्यायालयाचे आदेश
कार्यालयातील सहकारी असलेल्या दिव्यांग महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाते यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (JFMC) यांनी बंडगार्डन पोलिसांना दिले आहेत.
पुणे जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. शिवाजी विधाते यांच्याविरुद्ध दिव्यांग कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही घटना डिसेंबर २०२१ मध्ये घडली होती.
डॉ. विधाते यांनी पीडितेला कामासंदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात बोलावले. तिथे तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर, पीडितेने तत्काळ बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर विशाखा समितीने तपास केला. मात्र विधाते यांच्या विरोधात पोलीसांनी एफआयआर नोंदविला नाही.
त्यानंतर पीडितेने भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४, ४२०, ५०४, ५०६ आणि ५०९ अंतर्गत न्यायालयात खाजगी फौजदारी तक्रार दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने बंडगार्डन पोलिसांना तीन महिन्यांत एफआयआर दाखल करून तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.