थेरगाव क्विननंतर हडपसरच्या “बादशाह”ची हवा टाईट, रिल्समधून पोलीसांना आव्हान देणाऱ्याला अटक
काही वर्षांपूर्वीच इन्स्टाग्रामवर थेरगाव क्विन हँडल चालवणाऱ्या तरुणीला रिल्समध्ये अश्लील भाषा वापल्यामुळे पोलिसांनी तरुणीला समज दिली होती. आता पुण्याच्या हडपसरमधून एक तरुण थेट गुन्हेगारीचे उदातीकरण करत थेट पोलिसांनी आव्हान देत असल्याचे समोर आले आहे. मात्र, व्हिडिओ व्हायरल होताच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने या तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच पोलिसांनी या तरुणाकडून एका व्हिडिओतूनच माफीनामा तयार करून घेतला आहे.
पवन संतोष भारती (वय २०, रा. तरवडे वस्ती, मोहम्मदवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने थेट सोशल माध्यमावर येत एक रील्स बनवला होता. त्या रिल्समध्ये तरुण म्हणतो, हे हडपसर गाव आहे, इथे दुनियादारी नाही गुन्हेगारी चालती. त्याने बादशाह नावाचे रिल्स बनवून थेट पोलिसांनाच आव्हान दिले होतो.
मात्र, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस तरुणाचा शोध घेत होते. शोध घेत असताना पोलीसांना खबऱ्यामार्फत बातमी मिळाली की, हडपसर येथील इंडस्ट्रियल एरियातील शिंदेवस्ती येथे तरुण थांबला आहे. त्यानुसार, पोलीसांनी तरुणाला ताब्यात घेऊन त्याचेकडे चौकशी केली. यावेळी अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक लोखंडी कोयता मिळून आला आहे. पोलीसांनी तरुणाचा अटक करून त्याच्याकडून माफीनामा घेतला आहे.