ज्योतिषाकडून मुहूर्त काढत आरोपींकडून घरावर दरोडा, बारामातीत १ कोटी रूपयांची चोरी
महिलेचे हात-पाय बांधत मारहाण करत बारामती येथे १ कोटी ७ लाखा रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांना पकडण्यात अखेर पोलिसांना यश आले. धक्कादायक म्हणजे, दरोडा टाकण्यासाठी मुहूर्त काढणाऱ्या ज्योतिषाला या दरोडेखोरांनी आठ लाख रुपये दिले होते. या प्रकरणी सहा जणांना पोलीसांनी अटक केली आहे.
सचिन अशोक जगधणे (वय ३०, रा. गुणवडी, २९ फाटा, ता. बारामती), रायबा तानाजी चव्हाण (वय ३२, रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर), रविंद्र शिवाजी भोसले (वय २७, रा. निरावागज, बारामती), दुर्योधन उर्फ दिपक उर्फ पप्पू धनाजी जाधव (वय ३५, रा. जिंती हायस्कूलजवळ, ता. फलटण, जि. सातारा), नितीन अर्जून मोरे (वय ३६, रा. धर्मपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्यासह रामचंद्र वामन चव्हाण (वय ४३, मूळ रा. आंदरूड, ता. फलटण, जि. सातारा, सध्या रा. वडूज, ता. खटाव, जि. सातारा) अशी या दरोड्यातील आरोपींची नावे आहेत. ज्योतिषी रामचंद्र वामन चव्हाण याने चांगला मुहूर्त काढून दिल्याने त्याला दरोडेखोरांनी आठ लाख रुपये दिले.
देवकातेनगर येथे सागर शिवाजी गोफणे व त्यांची पत्नी तृप्ती हे दोन मुलांसह राहतात. २१ एप्रिल रोजी सागर हे तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले होते. पत्नी व मुले घरी होती. यावेळी रात्री आठ वाजता चोरट्यांनी त्यांच्या घराच्या कंपाऊंडवरून प्रवेश करत तृप्ती यांना मारहाण केली. त्यांचे हात-पाय बांधले. तोंडात कापडाचा बोळा कोंबून घरात प्रवेश केला होता. ९५ लाख ३० हजाराची रोख रक्कम, ११ लाख ५९ हजार रुपयांचे २० तोळे दागिने, ३५ हजार रुपयांचा मोबाईल असा १ कोटी ७ लाख रुपयांचा ऐवज जबरीने चोरून नेला होता.
या गुन्ह्यातील आरोपी एमआयडीसीतील मजूर असल्याची माहिती मिळाल्यानंतर संशयितांवर बारकाईने नजर ठेवण्यात आली. वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेत अद्यापपर्यंत पोलिसांनी ७६ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यात ६० लाख ९७ हजाराची रोख रक्कम असून १५ लाख ३५ हजार रुपये किमतीचे २६ तोळ्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.