दारु पिताना झालेल्या वादातून तरुणाची हत्या, वाघोलीतील घटना
दारु पिताना झालेल्या वादातून तरुणावर धारधार शस्त्राने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी रात्री दहाच्या सुमारास पुण्यातील वाघोली परिसरातील सिट्रोन सोसायटी समोर घडली आहे. या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शैलेश मांडगीकर असे खून झालेल्याचे नाव आहे. राम सुभाष श्रीराम (वय २५, रा. बेरळी बुद्रुक, मुखेड, जि. नांदेड), गोपाल ज्ञानोबा कोटालापुरे (वय २५, रा. नांदेड नाका, महादेवनगर जि. लातूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संगम चंद्रशेखर धारिया (वय २३, रा. सिधावट खास, कुशीनगर, उत्तरप्रदेश) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटलापुरे, धारिया, श्रीराम, मांडगीकर कामगार आहेत. श्रीराम, कोटालापुरे, मांडगीकर बुधवारी रात्री वाघोली-केसनंद रस्त्यावरील सिट्रोन सोसायटीसमोर दारू पित होते. ठेकेदाराने मांडगीकरला श्रीरामच्या सांगण्यावरुन कामावरुन काढल्याने त्यांच्यात वाद झाला. मांडगीकरने श्रीराम आणि कोटलापुरे यांना दारुच्या नशेत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी मांडगीकर याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून केला आणि घटनास्थाळावरून पसार झाले. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.