रक्षक आहे की भक्षक ? बापानेच केले दोन मुलींचे अपहरण, खंडणीसाठी धमकीचा फोन

सासूच्या मालमत्तेतील दहा लाख रुपये घेण्यासाठी बापानेच पोटच्या मुलींच्या अपहरणाचा बनाव रचल्याचे वाकड पोलिसांनी उघडकीस आणले आहे. त्यानंतर खंडणीचा बनावट फोन करून खंडणी देण्यासाठी दबाव टाकणाऱ्या बापाला अटक करून वाकड पोलिसांनी मुलींची सुटका केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 31 Aug 2023
  • 07:33 pm
kidnapped : रक्षक आहे की भक्षक ? बापानेच केले दोन मुलींचे अपहरण, मालमत्तेसाठी खंडणीची मागणी

रक्षक आहे की भक्षक ? बापानेच केले दोन मुलींचे अपहरण, खंडणीसाठी धमकीचा फोन

वाकड पोलीसांनी बापाला केली अटक

राखी खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या दोन मुलींचे अपहरण झाल्याचे समजल्याने पोलिसांसह कुटुंबाची पूर्ती धावपळ उडाली. मात्र, सासूच्या मालमत्तेतील दहा लाख रुपये घेण्यासाठी बापानेच पोटच्या मुलींच्या अपहरणाचा बनाव रचल्याचे वाकड पोलिसांनी उघडकीस आणले आहे. त्यानंतर खंडणीचा बनावट फोन करून खंडणी देण्यासाठी दबाव टाकणाऱ्या बापाला अटक करून वाकड पोलिसांनी मुलींची सुटका केली आहे.

सचिन मोहिते असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सारिका कैलास ढसाळ (वय ३८, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास उपनिरीक्षक रोहित दिवटे आणि त्यांचे कर्मचारी गस्त घालत होते. कोकणे चौकात पोलिसांनी काहीजण घाईगडबडीत जात असल्याचे दिसल्याने पोलिसांनी त्यांना हटकले. तेंव्हा सारिका ढसाळ यांनी सांगितले की, त्यांची दोन वर्षांची मुलगी आणि त्यांची बहिण शितल सचिन मोहीते (रा. वाघोली) यांची १५ वर्षांची मुलगी बेपत्ता आहेत. मंगळवारी सायंकाळी दोघीजणी राखी खरेदी करण्यासाठी बाहेर आल्या होत्या. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या आहेत.

घटनेची माहिती वरिष्ठांना कळवण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत वाकड पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके तयार करून मुलींचा शोध सुरू केला. पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली असता त्यावेळी अपहृत १५ वर्षीय मुलीचे वडील सचिन मोहिते देखील हजर होते.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आपण वाघोली येथून आलो असल्याचे सचिन याने आपल्या जबाबात सांगितले. पोलिसांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता घटना घडताना सचिन हा कार सर्व्हिसिंग साठी घेऊन गेल्याचे शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे सचिन याच्यावर पोलिसांना संशय बळावला.

पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली असता सचिनच्या कार सारख्या दिसणाऱ्या कारमध्ये बसून दोन्ही मुली गेल्याचे दिसले. बुधवारी सकाळी पुन्हा पोलीस फिर्यादी यांच्या घरी गेले असता सचिन याच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, बहिण सारिका यांचा तीन महिन्यांपूर्वी मोबाईल हरवला होता.

त्या नंबरवरून अपहरणकर्त्यांचा फोन आला होता. ‘तुमच्या मुली सुखरूप पाहीजे असतील तर पोलीसांना काही न सांगता १० लाख रुपये दया. नाहीतर तुमच्या मुलीचे बरेवाईट करेन’ अशी धमकी दिल्याचे सांगितले. त्या फोनवर सचिन मोहिते याचे बोलणे झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून सचिन मोहिते यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न केले. त्यानुसार पोलिसांनी सचिनकडे कसून चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले. सासू पुष्पा अल्हाट यांना भीती दाखवून त्यांच्या बँकेत असणाऱ्या जंगम मालमत्तेपैकी दहा लाख रुपये मिळवण्यासाठी हा अपहरणाचा बनाव केल्याचे त्याने सांगितले.

त्याने दोन्ही मुलींना वाघोली येथे सुरक्षित ठिकाणी ठेवले असून त्या सकाळी दहा वाजता वाघोली येथून निघून मनपा पुणे येथे येणार आहेत, असे त्याने सांगितले. त्यामुळे पोलिसांनी मनपा पुणे येथे तीन पथके पाठवली. मात्र प्रवासाला लागणाऱ्या वेळेपेक्षा जास्त वेळ झाला तरीही मुली मनपा पुणे येथे पोहोचल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांची चिंता वाढू लागली.

सचिन याने मुलींना ठेवलेल्या जागी जाऊन पोलिसांनी पाहणी केली असता तिथे देखील मुली मिळून आल्या नाहीत. त्यानंतर पोलिसांनी पीएमपीएल प्रशासनाशी समन्वय साधत वाघोली ते पुणे मनपा यादरम्यानच्या बस चालक व वाहकांना संपर्क करत मुलींची माहिती घेतली. त्यानंतर दुपारी दीड वाजताच्या सुमारास मुलींना बसमधून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सचिन मोहिते याला अटक केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, रोहीत दिवटे, सहायक फौजदार बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार वंदू गिरे, संदीप गवारी, स्वप्निल खेतले, प्रमोद कदम, अतिश जाधव, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, प्रशांत गिलबिले, भास्कर भारती, अजय फल्ले, रमेश खेडकर, कौंतेय खराडे, सागर पंडीत आदींच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest