गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याने आरोपींना मदत केली, नितीन म्हस्के हत्याप्रकरणी कुटुंबीयांचा आरोप
पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील मंगला चित्रपटगृहाजवळ मंगळवारी रात्री नितीन म्हस्के नावाच्या तरुणाचा दहा ते बारा जणांच्या टोळक्यांनी सपासप वार करून खून केला. या प्रकरणात गुन्हे शाखेतील एक पोलीस कर्मचारी सहभागी असल्याचा आरोप नितीन म्हस्केंच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी म्हस्के कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी ससून रुग्णालयाच्या परिसरात बुधवारी आंदोलन केले.
मंगला चित्रपटगृहाच्या एक्झिट गेटसमोर मंगळवारी रात्री १ वाजून १० मिनिटांनी सागर कोळानट्टी उर्फ यल्ल्या (वय ३२, रा. ताडीवाला रोड, पुणे) आणि त्याच्या साथीदारांनी नितीनवर धारदार शस्त्राने वार केले. या प्रकऱणात शिवाजीनगर पोलीसांनी इम्रान शेख (वय ३२) आणि विवेक नवधर ऊर्फ भोला (वय २४, दोघेही रा. ताडीवाला रोड, पुणे) यांना अटक केली आहे. या दोघांसह मलिक कोळ्या ऊर्फ तुंड्या (वय २४), पंडित कांबळे (वय २७), विवेक नवधर ऊर्फ भोला (वय २४), लॉरेन्स पिल्ले (वय ३३), सुशील सूर्यवंशी (वय ३०), मनोज हावळे ऊर्फ बाबा (वय २५), आकाश गायकवाड ऊर्फ चड्डी (वय २४), (रा. सर्व ताडीवाला रोड, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नोव्हेंबर २०२२ मध्ये कोरेगाव पार्कमधील एका हॉटेलच्या बाहेर नितीन म्हस्के, अजय साळुंके आणि त्यांच्या इतर साथीदारांनी सागर कोळनट्टी याच्यावर हल्ला केला होता. कोळनट्टी आणि त्याचे साथीदार एका हॉटेलमधून वाढदिवस साजरा करून बाहेर आल्यानंतर पार्किंगच्या परिसरात म्हस्केनी त्यांना गाठून सिमेंटच्या ब्लॉकने हल्ला केला होता. हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाल्यानंतर कोळनट्टीला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीसांनी म्हस्के आणि त्याच्या साथीदारावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्याचाच बदला म्हणून मंगळवारी रात्री सागर आणि त्याच्या साथीदारांनी म्हस्केचा काटा काढला.
परंतु, पोलीसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले. आरोपी राहत असलेल्या परिसरातच राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर म्हस्केच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे. म्हस्केचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आला होता. त्यावेळी स्थानिक नागरिक आणि म्हस्केच्या कुटुंबीयांनी या परिसरात गर्दी केली होती. पोलीस कर्मचारी निखील जाधव यांचा नितीन म्हस्केंच्या खूनात सहभाग असल्याचा आरोप कुटुंबीयांनी यावेळी केला. मध्यस्थीसाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांकडे त्यांनी कारवाईची मागणी केली.
माध्यमांशी बोलताना नितीनचे वडील म्हणाले की, “निखील जाधव गुन्हेशाकेत कार्यरत आहे. त्यामुळे तो गुन्हेगारांना मदत करतो. रात्री देखील तीन गुन्हेगार त्याच्यासोबत होते. मी त्याला म्हणालो देखील, गुन्हेगारांना सोबत घेऊन फिरतो का ? तर मला म्हणाला तुमच काय काम आहे, एवढ्या रात्री कशाला बाहेर फिरताय? माझा मुलगा कुठेच बाहेर जात नव्हता. मात्र, दोन दिवसांपुर्वीच या मुलांनी चित्रपटाचे तिकीट काढलेले. याबाबत मला माहित नव्हते.”
नितीनची आई म्हणाली की, काल नितीन मित्रांसोबत फिरायला गेला होता. रात्री नऊ वाजता त्याने मला फोन करून सांगितले की, मी चित्रपट पाहायला चाललो आहे. आणि रात्री उशीरा त्याच्यावर हल्ला झाल्याने आम्हाला समजले. हा आमच्यासाठी मोठा धक्क होता. रात्रीपासून आम्ही पोलीस ठाण्यात ठाण मांडून आहोत. परंतू पोलीसांकडून काहीही कठोर कारवाई केली जात नाही. अद्यापही सर्व आरोपींना पकडण्यात आलेले नाही.