Mahavitaran : महावितरणचे कर्मचारी भासवून परस्पर वीजमीटर बदलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, गुन्हा दाखल

महावितरणचे कर्मचारी असल्याचे भासवून महावितरण व वीजग्राहकांचे लाखो रुपयांचे नुकसान करणाऱ्या टोळीचा चाकणमध्ये पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Mahavitaran : महावितरणचे कर्मचारी भासवून परस्पर वीजमीटर बदलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, गुन्हा दाखल

महावितरणचे कर्मचारी भासवून परस्पर वीजमीटर बदलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, गुन्हा दाखल

तोतया कर्मचाऱ्यांपासून सावधान : मुख्य अभियंता राजेंद्र पवार

‘तुमच्याकडे लावलेले वीजमीटर संथ झाले आहे. कनेक्शन दिल्यापासून तुम्हाला लाखो रुपयांचे बिल भरावे लागेल. तुमचे वीजमीटर बदलून देतो व त्यासाठी काही रक्कम द्यावी लागेल’ अशी बतावणी करून तसेच महावितरणचे कर्मचारी असल्याचे भासवून महावितरण व वीजग्राहकांचे लाखो रुपयांचे नुकसान करणाऱ्या टोळीचा चाकणमध्ये पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, चाकण परिसरात काही ठिकाणी अज्ञात व्यक्ती महावितरणचे कर्मचारी असल्याची बतावणी करून वीजग्राहकांची आर्थिक फसवणूक करीत असल्याची कुणकुण महावितरणला लागली होती. यामध्ये हे तोतया कर्मचारी वीजग्राहकांशी थेट संपर्क साधून ‘तुमचे मीटर संथ असल्याने मोठ्या रकमेचे बिल येणार आहे. ते न भरल्यास वीजपुरवठा खंडित होणार आहे’ अशी भीती दाखवत आर्थिक लुबाडणूक करणे, जुने महावितरणचे मीटर काढून गहाळ करणे व त्याठिकाणी बाजारातून खरेदी केलेले मीटर ग्राहकांकडे लावत असल्याचे प्रकार होत असल्याची माहिती मिळाली.

या प्रकारच्या माहितीची मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी गंभीर दखल घेतली. त्यांच्या मार्गदर्शनात पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता युवराज जरग, राजगुरुनगर विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके, चाकणचे उपकार्यकारी अभियंता विजय गारगोटे, सहायक अभियंता अविनाश सावंत यांनी कर्मचाऱ्यांसह संशयास्पद वीजमीटरची तपासणी सुरु केली. यामध्ये चाकण येथील नाणेकरवाडी, आंबेठाण रस्ता, माणिक चौक परिसरात काही ग्राहकांकडे वीजमीटर बदलले आहे परंतु त्याची महावितरणकडे त्यांची नोंद नाही किंवा जुने मीटर महावितरणकडे जमा केले नसल्याचे आढळून आले.

याबाबत संबंधित वीजग्राहकांना विश्वासात घेत अधिक तपास केला असता परस्पर वीजमीटर बदलून देणारा आरोपी दयानंद पट्टेकर हा मीटर रीडिंग घेणाऱ्या अलमदाद कम्प्युटर एजंसीशी संबंधित असल्याचे उघड झाले. आरोपी पट्टेकर व अज्ञात तीन व्यक्तींनी महावितरणचे भरारी पथकाचे कर्मचारी असल्याचे भासवून कोणतीही पूर्वपरवानगी न घेता गेल्या ऑगस्ट महिन्यात तीन वीजग्राहकांकडील वीजमीटर परस्पर बदलून दिले. यामध्ये महावितरणचे सुमारे १ लाख २२ हजार २७७ युनिटचे म्हणजे १३ लाख २८ हजार २७० रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणी महावितरणकडून चाकण पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी  भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कलम १३६ व १३८ नुसार दयानंद पट्टेकर व तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तोतया कर्मचाऱ्यांपासून सावधान : मुख्य अभियंता राजेंद्र पवार

वीजमीटरधील वापर कमी दाखवणे, संथगतीसाठी मीटरमध्ये फेरफार किंवा वीजबिलाची रक्कम कमी करून देणे आदी आमिष दाखविणे तसेच महावितरणचा कर्मचारी असल्याचे भासवून किंवा अन्य खाजगी व्यक्तीने वीजग्राहकांकडे रकमेची मागणी केल्यास त्यास कोणताही प्रतिसाद देऊ नये. याबाबत महावितरणच्या संबंधित कार्यालयामध्ये कळवावे किंवा तक्रार करावी असे आवाहन मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest