Illegal moneylending : बेकायदेशीर सावकारीप्रकरणी गुन्हा दाखल, अटक न झाल्याने गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील डोंगरगण येथील बेकायदेशीर सावकारी करून सर्वसामान्यांना नाडणाऱ्या सावकाराच्या घराची सहायक निबंधक यांच्या पथकाने झडती घेतली. या कारवाईमध्ये खरेदीखत दस्तऐवज व धनलक्ष्मी अकांऊट बुकसह इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली. त्यांच्यावर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sun, 24 Sep 2023
  • 12:34 pm
बेकायदेशीर सावकारीप्रकरणी गुन्हा दाखल

बेकायदेशीर सावकारीप्रकरणी गुन्हा दाखल

अटकेच्या भितीने सावकार गावातून पसार

ओंकार गोरे

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील डोंगरगण येथील बेकायदेशीर सावकारी करून सर्वसामान्यांना नाडणाऱ्या सावकाराच्या घराची सहायक निबंधक यांच्या पथकाने झडती घेतली. या कारवाईमध्ये खरेदीखत दस्तऐवज व धनलक्ष्मी अकांऊट बुकसह इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली. त्यांच्यावर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश रभाजी चोरे (रा. डोंगरगण, ता. शिरूर, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या सावकाराचे नाव आहे. या प्रकरणी विलास रंगनाथ चोरे तक्रारी अर्ज दिला होता. जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये अनेक व्यक्तींना व्याजाने पैसे दिले असल्याबाबतच्या नोंदी आढळून आल्या आहेत. मात्र, गुन्हा दाखल होताच सावकर अटकेच्या भितीने पसार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक निबंधक यांच्या पथकाने सादर केलेल्या खरेदीखत दस्तऐवज क्रमांक ३२९/२०२० नुसार लिहून देणार- विलास रंगनाथ चोरे व लिहून घेणार- सुरेश रभाजी चोरे यांचे मुळ खरेदीखत व धनलक्ष्मी अकांऊट बुक नाव असलेल्या खतावाणी नोंदवहीमध्ये अर्जदार यांचा मुलगा सतिश विलास चोरे यांना व्याजाने पैसे दिल्याबाबतची नोंद आहे. तसेच इतर व्यक्तींना व्याजाने पैसे दिल्याबाबतच्या नोंदी सदर खतावणीमध्ये आढळून आलेल्या आहे. अर्जदार विलास रंगनाथ चोरे यांनी सहायक निबंधक कार्यालयात दाखल केलेल्या मुळ अर्जासोबतच्या कागदपत्रांवरुन तसेच घरझडतीवेळी मिळालेले दस्ताऐवज व नोंदवहीतील नोंदीवरून बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करीत असल्याचे आढळून आल्याने सुरेश रभाजी चोरे यांच्यावर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

सुरेश रामाजी चौरे या सावकारापासून आमच्या गावातील अनेक लोकांना त्रास होत आहे. त्यामुळे आम्ही उपोषणाला बसणार आहेत. याबाबत आमच्या गावातील विलास रंगनाथ चौरे यांनी गुन्हा दाखल केला. परंतु गुन्हा दाखल होऊन देखील तो गावात खुलेआम फिरत आहे. आमच्या सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तरी संबंधित सुरेश राभाजी चोरे या सावकाराला २४ तासामध्ये अटक झाली नाही तर आम्ही डोगरगण येथील मारुती मंदिरासमोर उपोषणाला बसणार आहे, अशा मागणीचे निवेदन गावकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि पुणे ग्रामिण पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांना दिले आहे.

आरोपीचा शोध घेत आहोत

घटनेचे गांभीर्य लक्षात येताच संबंधित सावकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होताच अटकेच्या भितीने आरोपी गावातून पसार झाला आहे. आम्ही त्यांना अटक करणार आहोत. आमच्या टीमकडून शोध सुरू आहे. त्यांना लवकरच अटक करू, असे शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय जगताप यांनी सीविक मिररशी बोलताना सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest