संग्रहित छायाचित्र
आळंदीतील धर्मशाळेत चार्जिंगला लावलेले ५ मोबाईल फोन चोरट्याने पळवल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार आळंदीतील गोपाळपुरा येथील कोयणा खोरा धर्मशाळेत शुक्रवारी (दि. २) रात्री २ ते सकाळी ७ च्या सुमारास घडली. या प्रकरणी मोबाईल चोरट्याला आळंदी पोलीसांनी अटक केली आहे.
अक्षय उमाशंकर पाटील (वय २९, रा. देहुफाटा आळंदी. मुळगाव पाचोरा, परधाडे, जि. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी चोरट्याचे नाव आहे. या प्रकरणी विशाल रमेश पिंपळे (वय २३, रा. माऊली दर्षन कॉलनी, केळगाव, ता. खेड, जि. पुणे) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदीतील गोपाळपुरा येथील कोयणा खोरा धर्मशाळेत शुक्रवारी संध्याकाळी विशाल हे झोपले होते. मात्र, यावेळी त्यांनी दरवाजा उघडा ठेवला होता. याचाच फायदा घेत चोरटा धर्मशाळेत शिरला. त्यानंतर धर्मशाळेत चार्जिंगसाठी लावलेले ५६ हजार ५०० रुपये किमतीचे ५ मोबाईल फोन घेवून पळून गेला. या प्रकरणी विशाल यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीसांनी अक्षय विरोधात कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आळंदी पोलीस करत आहेत.