मुंढवा परिसरातून ४६ लाखाचे एम. डी. कोकेन जप्त, चार जणांना अटक
पुण्यातील मुंढवा परिसरातील लोणकर वस्ती येथून एम.डी. कोकेन आणि चसर असा एकून ४६ लाख ५९ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक १ ने केली आहे.
सागर कैलास भोसले (वय २६, रा. फ्लॅट न.०६, शितोळे बिल्डींग गल्ली नं. ६, शंकरनगर, खराडी, पुणे), अजितसिंग इंद्रजितसिंग भवानीया (वय ४०, रा. फ्लॅट नं.३०४,गुडविल ऑरचीड, धानोरी, पुणे), इम्ररीन गॅरी ग्रीन (वय ३७, रा. बंगला नं. २१/ए लेन नं.०६ खेसे पार्क लोहगाव रोड, पुणे) आणि एक महिला अशी अटक कऱण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्ट रोजी लोणकर वस्ती या ठिकाणी एक इसम आणि महिला त्यांच्या ओळखीच्या लोकांना एम. डी. कोकेन असे अंमली पदार्थाची मोठया प्रमाणावर विक्री करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीसानी सापळा रचून आरोपी सागर भोसले आणि एका महिलेला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ४४ लाख ११ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामध्ये २०८ ग्रॅम ९५० मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) व ०५ ग्रॅम ५५० मिलीग्रॅम कोकेन हा अंमली पदार्थ होते.
आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात मुंढवा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (ब), २२ (क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींची १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे. पोलीस कस्टडीत आऱोपींची अधिक चौकशी केली असता त्यांचे साथीदार अजितसिंग आणि इम्ररीन हे मिळून आले. त्यांना अटक करून एकुण २ लाख ४८ हजार रुपये किमतीचा जप्त कऱण्यात आला आहे. यामध्ये ०४ ग्रॅम कोकेन व ७१ ग्रॅम चरस हे अंमली पदार्थ, मोबाईल फोन असा ऐवज आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मुंढवा पोलीस करत आहेत.