वाहन तपासणीत वाकडमध्ये सापडली २७ लाखांची रोकड

मावळ लोकसभेच्या कार्यक्षेत्रात वाकड येथील स्थिर सर्व्हेक्षण पथकाद्वारे वाहन तपासणीत २७ लाख रुपये रोकड जप्त केली आहे. ही कारवाई मंगळवारी (२३ एप्रील) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

Wakad

संग्रहित छायाचित्र

यापुढे रुग्णवाहिका, खासगी बस, काही अधिकाऱ्यांची वाहने देखील तपासणार

विकास शिंदे
मावळ लोकसभेच्या (Maval Lok Sabha) कार्यक्षेत्रात वाकड येथील स्थिर सर्व्हेक्षण पथकाद्वारे वाहन तपासणीत २७ लाख रुपये रोकड जप्त केली आहे. ही कारवाई मंगळवारी (२३ एप्रील) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. ही रोकड जप्त करुन पंचनामा करत आयकर विभागाकडे अधिक तपासासाठी ताब्यात देण्यात दिली आहे. यापुढे चिंचवड विधानसभा कार्यक्षेत्रात रुग्णवाहिका, खासगी बस देखील तपासणार आहे, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने २०५ चिंचवड विधानसभा कार्यक्षेत्रात चार ठिकाणी १२ स्थिर सर्व्हेक्षण पथक (एसएसटी) कार्यरत केले आहे. या पथकाद्वारे चोवीस तास अवैध रोकड, मद्य आणि अमली पदार्थ, हत्यारे आदी प्रतिबंध करण्यासाठी दुचाकी, चारचाकी वाहनांची कसून तपासणी करत आहे.  या पथकातील वाकड येथील उड्डाणपूलाखाली नाकाबंदीत दंडाधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी २७ लाख रुपयांची रोकड वाहन तपासात आढळून आली. सदरची रोकड निवडणूक कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेवून रितसर पंचनामा आणि व्हीडीओ शुटिंग करुन पुढील कारवाईकरिता आय कर विभागाकडे सुपुर्द केली आहे.

निवडणूक विभाग, पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून (Pimpri Chinchwad Police) सांगवी नाका, वाकड, काळा खडक, मुकाई चौक या चार ठिकाणी एकूण १२ स्थिर सर्व्हेक्षण पथक (SST) कार्यरत आहेत. निवडणूक कर्मचारी आणि पोलिस पथकाकडून टू व्हीलर आणि फोर व्हीलर वाहनाची कसून तपासणी सुरु आहे.  त्यावेळी मुंबईकडून वाकडच्या दिशेने एक चारचाकी गाडी आली. सदरील पथकाने गाडी थांबवून त्या वाहनाची तपासणी केली. त्यावेळी गाडीत २७ लाख रोकड मिळून आली. गाडीतील व्यक्ती व्यावसायिक असल्याचे सांगत आहे. त्याने इलेक्ट्रिक दुकान असल्याचे सांगून ती दुकानाची रक्कम असल्याचे त्यांनी त्या पथकातील कर्मचाऱ्यांना सांगितले. मात्र, सदरील रकमेबाबत संबंधिताकडे कोणतीही पावती, कागदपत्रे आढळून आली नाहीत. त्यामुळे रोख रक्कम आणि गाडी निवडणूक विभाग आणि पोलिसांची जप्त करत कारवाई केली आहे.

सदरील वाहन आणि त्या गाडीचा निवडणूक विभागाच्या कर्मचा-यांनी साक्षीदार बोलावून पंचनामा करत कागदपत्रासह ती रोख रक्कम आयकर विभागाकडे सुपुर्द केली आहे. त्यामुळे ही रक्कम कोणाची आहे. कोठून आणली. एवढी मोठी रक्कम कुणी दिली. त्यांची कागदपत्रे कुठे आहे. यासंर्दभात सविस्तर चौकशी आयकर विभागाकडून केली जाणार आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थिर सर्व्हेक्षण पथकाद्वारे वाहन तपासणी कसून सुरु आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून अवैध रोकड, मद्य, हत्यारे हे प्रतिबंधक असल्याने प्रत्येक वाहने थांबवून तपासली जात आहे. यापुढे अनेक रुग्णवाहिका देखील सामाजिक कार्यकर्त्यांच्या आहेत. रस्त्यावरुन जाताना रुग्णवाहिका सुसाट जातात. त्या रुग्ण नसलेल्या रुग्णवाहिका थांबवून देखील तपासणी केली जाईल. त्याशिवाय खासगी बस, अनेकदा काही अधिकाऱ्यांची वाहने देखील तपासली जाणार आहेत, अशी माहिती सहायक निवडणूक अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest