सुशिक्षित पुणेकरांनी सायबर दरोड्यात गमावले २५४ कोटी; फसवणूक झालेल्यांत आयटी इंजिनियर, नोकरदार, व्यावसायिकांची संख्या सर्वाधिक

सायबर गुन्हेगारी दिवसागणिक आक्राळविक्राळ रूप धारण करीत चालली आहे. त्यातही सायबर चोरटे सुशिक्षित पुणेकरांना आपल्या जाळ्यात ओढून कोट्यवधी रुपये ऑनलाईन लंपास करीत आहेत. विविध क्लृप्त्या वापरून पुणेकरांच्या खिशाला भगदाड पाडत आहेत.

Cyber crime

संग्रहित छायाचित्र

अवघ्या चारच महिन्यात १०८ कोटी रुपये खात्यांमधून लंपास, अडीच वर्षात तब्बल ११८९ गुन्हे दाखल, कमी कालावधीत जास्त पैसे कमावण्याचा मोह फसवणुकीला कारणीभूत

सायबर गुन्हेगारी (Cyber Crime) दिवसागणिक आक्राळविक्राळ रूप धारण करीत चालली आहे. त्यातही सायबर चोरटे सुशिक्षित पुणेकरांना आपल्या जाळ्यात ओढून कोट्यवधी रुपये ऑनलाईन लंपास करीत आहेत. विविध क्लृप्त्या वापरून पुणेकरांच्या खिशाला भगदाड पाडत आहेत. मागील अडीच वर्षांमध्ये घडलेल्या विविध सायबर गुन्ह्यांमध्ये पुणेकरांचे तब्बल २५४ कोटी रुपये लुटले गेले आहेत.

ट्रेंडिंग फ्रॉड, टास्क फ्रॉड, फेडेक्स फ्रॉड, मेन ईन मिडल फ्रॉड, फेसबुक फ्रेन्ड रिक्वेस्ट  फ्रॉड, मेट्रिमोनी फ्रॉड, सेक्सटॉर्शन, लोन अॅप याद्वारे ऑनलाईन फसवणूक तसेच आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना (इंटरपोल), गुप्तचर विभाग (आयबी), केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय), सायबर गुन्हे समन्वय केंद्र (एसी), नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो आदी केंद्रीय यंत्रणांच्या नावांचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारला जात आहे. चालू वर्षामधील जानेवारी ते एप्रिल या अवघ्या चार महिन्यात सायबर फसवणुकीचे तब्बल ३४५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये १०८ कोटी ९३ लाख ८५ हजार ८२८ रुपये सायबर चोरट्यांनी ऑनलाईन लंपास केले आहेत. तर, मागील अडीच वर्षात २५४ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. फसवणूक होणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण आयटी इंजिनियर, नोकरदार आणि व्यावसायिक पुणेकरांचे आहे. कमी कालावधीत जास्त पैसे कमावण्याचा मोह या फसवणुकीला कारणीभूत ठरल्याचे वास्तव या प्रकरणांतून समोर आले आहे.

संगणक, इंटरनेट, मोबाईल, समाजमाध्यम (सोशल मीडिया) फेसबुक, व्हॉटस्ॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आदींचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ऑनलाईन बँकिंग, ऑनलाईन खरेदी-विक्री, ऑनलाईन खाद्यपदार्थ मागविणे यांसह ऑनलाईन सेवा पुरवणाऱ्या संस्थांकडून प्रिपेड सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत..सायबर चोरटे अशाच सुविधांचा गैरवापर करून नागरिकांना गंडवतात. अनेकदा एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, बँक खाते बंद पडण्याची भीती दाखवतात. तसेच, शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा देण्याच्या आमिषाने अनेकांना गंडवले जात आहे.

झटपट पैसा कमावण्याच्या नादात अनेकजण कोट्यवधी रुपये गमावून बसले आहेत. सायबर चोरटे गुंतवणूकदारांना ऑनलाईन संपर्क साधून विविध व्हॉटसॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी करून घेत लाखो रुपयांना फसवत असल्याची अनेक उदाहरणे समोर येऊ लागली आहेत. ऑनलाईन फ्रॉड, स्टॉक मार्केटमधून नफा, वर्क फ्रॉम होम, टास्क वर्क आदी प्रकारच्या फसव्या जाहिराती आणि आमिषाला बळी पडलेले अनेकजण कोट्यवधी रुपये गमावून बसले आहेत. सोशल मीडियावर अपलोड केलेले नागरिकांचे फोटो सायबर भामटे डाऊनलोड करून घेतात. हे फोटो मॉर्फ करून महिलांना पाठवले जातात. त्याआधारे ब्लॅकमेल करीत त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. अनेकदा डेटिंग अॅपचा वापर करून नग्नावस्थेत व्हीडीओ कॉल करायला लावले जाते. मोहात अडकलेले नागरिक त्याला बळी पडतात. त्या कॉलचे रेकॉर्डिंग करून पैशांची मागणी केली जाते. त्याला ‘सेक्स्टॉर्शन’ असे म्हटले जाते. यासोबतच फेसबुक, इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवरून बनावट अकाऊंट तयार केले जाते. त्यानंतर, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैशांची मागणी केली जाते.

अलीकडच्या काळात तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना (इंटरपोल), गुप्तचर विभाग (आयबी), केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय), सायबर गुन्हे समन्वय केंद्र यांसारख्या विविध केंद्रीय एजन्सींच्या नावाचा गैरवापर सायबर गुन्हेगारांकडून पैसे उकळण्यासाठी केला जात आहे. विविध केंद्रीय एजन्सींचे उच्चपदस्थ शासकीय अधिकारी असल्याचे भासवून खोट्या सह्यांचे बनावट पत्र तयार करतात. हे पत्र बनावट ईमेलद्वारे नागरिकांना पाठविले जातात. या ईमेलद्वारे नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाईची भीती दाखवून ऑनलाईन पैसे भरण्यासाठी भाग पाडले जाते.

तसेच, केवायसी अपडेट, एमएससीबी इलेक्ट्रिक बिल भरले नसल्याचे सांगून लिंक पाठवून विविध प्रकारचे अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडले जाते. या अॅपवर गेल्यानंतर आपल्या मोबाईलचा पूर्ण अक्सेस सायबर गुन्हेगारांना मिळतो. त्यानंतर, संबंधितांचे बँक अकाऊंट रिकामे केले जाते. प्रॉव्हिडंट फंड, आर्मी ऑफिसर, एसबीआयच्या नावाने गंडवले जात असून मुंबई पोलीस-नार्कोटिक्स विभागाच्या नावाने देखील फसवणूक केली जात आहे.

अनेकदा नागरिक गुगलवरून विविध ऑनलाईन सुविधांसाठी नंबर शोधतात. फ्लाईट, हॉटेल, ट्रेन बुकिंग, कुरिअर कॅन्सलेशन इत्यादीसाठी गुगलवर नंबर शोधत असताना देखील फसवणूक केली जात आहे. सायबर चोरट्यांकडून ख्यातनाम कंपन्यांच्या नावाने स्वत:चे नंबर अपलोड करतात. या नंबरवर कॉल करून ग्राहक फसतात. त्यामुळे कंपन्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनच नंबर मिळवले पाहिजेत. यासोबतच ओएलएक्स या ऑनलाईन वेबसाईटवर कोणतीही वस्तू विकताना किंवा विकत घेताना संपूर्ण खात्री करणेदेखील आवश्यक आहे. विविध बिले भरण्यासाठी एनी डेस्क, क्विक सपोर्ट, रस्ट डेस्क, हॉप डेस्क आदी ॲप डाऊनलोड करायला सांगत ऑनलाईन गंडा घातला जातो. अलीकडच्या काळात टेलिग्रामचा वापरदेखील फसवणुकीसाठी केला जाऊ लागला आहे. टेलिग्रामचा सर्वाधिक वापर क्रिप्टोद्वारे होणारी फसवणूक आणि टास्क फ्रॉडसाठी (Task Fraud) केला जात आहे.

सायबर चोरट्यांनी 'फेडेक्स फ्रॉड' (FedEx Fraud) नावाचा नवा प्रकार शोधून काढला आहे. एखाद्या व्यक्तीला फोन करून त्यांना विदेशामधून महागडे गिफ्ट आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर हे गिफ्ट कस्टम विभागात अडकल्याचे आणि त्यामध्ये ड्रग्ज आढळून आल्याची बतावणी केली जाते. मुंबई पोलिसांचा लोगो असलेल्या बनावट क्रमांकावरून फोन केला जातो. स्काईपवर व्हीडीओ कॉल करून पोलीस बोलत असल्याचे भासवत पैसे भरायला सांगितले जातात. त्याद्वारे लाखो रुपयांची फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे.

पुणे पोलीस (Pune Police) उभारणार अत्याधुनिक सायबर लॅब

टास्क फ्रॉड, फेडेक्स, कुरिअर, क्रिप्टो, शेअर मार्केट आणि स्टॉकमधील गुंतवणूक व मोठा परतावा, केंद्रीय आणि राज्य यंत्रणांच्या नावाने गंडवण्याचे प्रकार, समाजमाध्यमावर प्रसारित होणारे रील्स, ट्रेंडस आदींचा विचार करून पुणे पोलिसांकडून अत्याधुनिक सायबर लॅब उभी केली जाणार आहे. या ठिकाणी ‘ई-ऑफिस’ प्रणाली विकसित केली जाणार आहे. नागरिकांच्या तक्रारींचे फसवणुकीच्या प्रकारानुसार वर्गीकरण होणार असून ही तक्रार आपोआप संबंधित ‘डेस्क’कडे वर्ग होणार आहे. सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी ठाणे स्तरावरील पोलिसांना प्रशिक्षित केले जाणार असून त्यांची ‘बेंचमार्क टेस्ट’देखील घेतली जाणार आहे.

या राज्यांमधून होतात सर्वाधिक सायबर फ्रॉड

राजस्थान-हरयाणा-उत्तर प्रदेश आणि झारखंड/बिहार या चौकोनामधून सर्वाधिक सायबर फ्रॉड केले जात आहेत. पुणेकरांचा लुटलेला पैसा या भागात जिरवला जातो आहे. विशेषत: राजस्थानमधील भरतपूर अलवार, हरयाणामधील नूह, गुरुग्राम, उत्तर प्रदेशामधील मथुरा आणि झारखंडमधील जमतारा या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका अहवालानुसार, देशभरात घडणाऱ्या सायबर गुन्ह्यांमधील ८० टक्के गुन्हे या दहा जिल्ह्यांमध्ये घडतात. यामध्ये भरतपूर, राजस्थान (१८ टक्के), मथुरा, उत्तर प्रदेश (१२ टक्के), नूह, हरयाणा (११ टक्के), देवघर, झारखंड (१० टक्के), जमतारा, झारखंड (९.६ टक्के), गुरुग्राम, हरयाणा (८.१ टक्के), अलवार, राजस्थान (५.१ टक्के), बोकारो, झारखंड (२.४ टक्के), कर्मातंड, झारखंड (२.४ टक्के), गिरिध, राजस्थान (२.३ टक्के) या जिल्ह्यांचा समावेश आहे.

काय काळजी घ्याल?

कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये

कोणत्याही अनोळखी मेसेजला प्रतिसाद देऊ नका

सायबर चोरट्यांनी सांगितलेले कोणतेही ॲप डाऊनलोड करू नका

मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डची माहिती कोणालाही देऊ नका

मोबाईलमध्ये चुकून ॲप डाऊनलोड झाल्यास तत्काळ अनइन्स्टॉल करा

मोबाईल फॉरमॅट करा. न्यामुळे छुपे ॲप अनइन्स्टॉल होतील.


सायबर गुन्ह्यांची आकडेवारी

वर्ष सायबर पोलीस ठाणे पोलीस ठाणे एकूण एकूण रक्कम
२०२२ ३७ ३२० ३५७ ६७ कोटी ८८ लाख १ हजार ३८५
२०२३ १०३ ३८४ ४८७ ७७ कोटी ४७ लाख ७४ हजार १२
२०२४ ५७ २८८ ३४५ १०८ कोटी ९३ लाख ८५ हजार ८२८
एकूण १९७ ९९२ ११८९ २५४ कोटी २९ लाख ६१ हजार २२५

 

सायबर गुन्ह्यांच्या तक्रारीकरिता हेल्पलाईन

 सर्वात महत्त्वाची हेल्पलाईन : १९३०

 हेल्पाईन क्रमांक - ७०५८७१९३७१/७०५८७१९३७५  

 सायबर पोलीस ठाणे - ०२०-२९७१००९७

 ई-मेल - crimecyber.pune@nic.in

 

सायबर गुन्हेगारी वाढत आहे. नागरिकांनी स्वत:वर संयम ठेवणे, कोणत्याही मोहाला, दबावाला, भीतीला बळी न पडता जागरूकता दाखविली पाहिजे. बनावट ई मेल आले तर त्याला प्रतिसाद देऊ नये. सायबर गुन्ह्यांबाबत समोर येऊन तक्रारी कराव्या. फसवणुकीच्या घटनांबाबत आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला, किंवा सायबर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करा. या गुन्ह्यांचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. यासाठी अत्याधुनिक सायबर लॅबदेखील उभी केली जाणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी प्रशिक्षित केले जात आहे. नागरिकांनी सजगता दाखविल्यास अशी फसवणूक टाळता येऊ शकेल.
– शैलेश बलकवडे, अतिरिक्त आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे पोलीस

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest