ऐन निवडणुकीच्या काळात पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; दरोडा विरोधी पथकाने केले पिस्तूल खरेदी-विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त

ऐन निवडणुकीच्या काळात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने मोठी कारवाई करीत वेपन डीलरसह चौघांना अटक करून त्यांच्याकडून सात पिस्तूल आणि पाच काडतुसे जप्त केली आहेत. शस्त्रांची शहरात होणारी खरेदी-विक्रीला काही अंशी ब्रेक लागला आहे.

दरोडा विरोधी पथकाने केले पिस्तूल खरेदी-विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त

सात पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे जप्त; वेपन डीलर देखील पोलिसांच्या जाळ्यात

ऐन निवडणुकीच्या काळात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने मोठी कारवाई करीत वेपन डीलरसह चौघांना अटक करून त्यांच्याकडून सात पिस्तूल आणि पाच काडतुसे जप्त केली आहेत. शस्त्रांची शहरात होणारी खरेदी-विक्रीला काही अंशी ब्रेक लागला आहे.

अर्जुन भाऊराव सूर्यवंशी (वय २०, रा. आळंदी), तुषार नथुराम बच्चे (वय ३१, रा. शिवाजीवाडी, मोशी), कमल रामदास राठोड (वय २६, रा. नाणेकरवाडी, ता. खेड), अंकित भस्के अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा विरोधी पथकातील पोलीस शिपाई गणेश सावंत, सुमित देवकर आणि विनोद वीर यांना मरकळ गाव येथे एक गुन्हेगार पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अर्जुन सूर्यवंशी याला सापळा लावून ताब्यात घेत त्याच्याकडून दोन पिस्तुल आणि दोन काडतुसे जप्त केली. सूर्यवंशी याच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने वेपन डीलर अंकित भस्के याच्याकडून हे पिस्तूल विकत आणले असल्याचे सांगितले. सूर्यवंशी याने भस्के याच्याकडून आणखी दोन पिस्तूल आणि काडतूस विकत घेऊन ते सराईत गुन्हेगार तुषार बच्चे याच्याकडे ठेवण्यास दिल्याचेही त्याने तपासात सांगितले. पोलिसांनी मोशी येथून बच्चे याला ताब्यात घेत त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले.

दरम्यान, वेपन डीलर असलेला अंकित भस्के याला अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर पोलिसांनी पिस्तूल बाळगल्या प्रकरणी अटक केली होती. तो न्यायालयीन कोठडीत असताना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला कारागृहातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून आणखी दोन पिस्तूल आणि एक काडतूस पोलिसांनी जप्त केले.

अंकित याने आणखी एक पिस्तूल नाणेकरवाडी येथील कमल राठोड याला विकले होते. पोलिसांनी कमल राठोड याला अटक करून त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले. या कारवाईमध्ये दरोडा विरोधी पथकाने सात पिस्तूल आणि पाच काडतुसे जप्त केली आहेत.

आरोपी अंकित भस्के हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर पिंपरी-चिंचवड आणि अहमदनगर येथे शरीराविरुद्धचे गुन्हे, अग्निशस्त्र बाळगणे, तस्करी करणे असे गुन्हे दाखल आहेत. अर्जुन सूर्यवंशी याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. तुषार बच्चे याच्या विरोधात देखील जमाव जमवून दहशत निर्माण करणे, अग्निशस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. दरोडा विरोधी पथकाने चालू वर्षात पाच कारवायांमध्ये १३ पिस्तूल आणि १३ काडतुसे जप्त केली आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, सागर शेडगे, राहुल खारगे, प्रवीण कांबळे, प्रवीण माने, आशिष बनकर, गणेश हिंगे, चिंतामण सुपे, औदुंबर रोंगे, उमेश पुलगम, नागेश माळी, प्रमोद उलगे यांनी ही कारवाई केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest