पिंपरी-चिंचवड: सहा वर्षांत सव्वाशे टोळ्यांवर मकोका; टोळ्यांमधील ८८७ गुन्हेगारांवर कारवाई

पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेपासून म्हणजेच २०१८ ते २०२४ या सहा वर्षांच्या काळात पोलिसांनी शहरातील तब्बल १२५ गुन्हेगारी टोळ्यांवर मकोकाची कारवाई केली आहे. या टोळ्यांमधील एकूण ८८७ गुन्हेगारांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

संग्रहित छायाचित्र

चालू वर्षांत १२ टोळ्यांवर कारवाई

पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेपासून म्हणजेच २०१८ ते २०२४ या सहा वर्षांच्या काळात पोलिसांनी शहरातील तब्बल १२५ गुन्हेगारी टोळ्यांवर मकोकाची कारवाई केली आहे. या टोळ्यांमधील एकूण ८८७ गुन्हेगारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे चालू वर्षांत अवघ्या चार महिन्यांत तब्बल १२ टोळ्यांवर मकोका कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या या कठोर कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणात चाप बसला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी १५ ऑगस्ट २०१८ मध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. शहरात वाढलेली गुन्हेगारी, टोळी युद्ध, वाढत्या टोळ्यांची दहशत, महिलांची सुरक्षा या सर्व गोष्टींसाठी पोलीस आयुक्तालायची स्थापना करण्यात आली. आयुक्तालयाच्या स्थापनेपासूनच पोलिसांनी शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

यामध्ये सर्वप्रथम शहरात असणाऱ्या गुन्हेगारी टोळ्या, नव्याने निर्माण होत असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. शहरात अनेक छोट्या मोठ्या गुन्हेगारी टोळ्या अस्तित्वात आहेत. टोळी प्रमुखाच्या नावाने या टोळ्या ओळखल्या जातात. या टोळ्यांमधील सर्वच सदस्य नामचीन गुन्हेगार असतात. खून, खुनाचा, प्रयत्न, चोरी, मारहाण असे अनेक गुन्हे या सदस्यांवर दाखल असतात. त्यामुळे पोलिसांकडून सर्वप्रथम या टोळ्यांवर पाळत ठेवण्यात आली.

त्यांचे सर्व रेकॉर्ड तयार करण्यात आले. त्यानंतर या टोळ्यांवर मकोका कारवाई करण्यात आली आहे. २०१८ मध्ये अवघ्या एका टोळीवर मकोका कारवाई करण्यात आली होती. या टोळीतील सात सदस्यांवर ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर २०१९ मध्ये नऊ टोळ्यांवर मकोका कारवाई करण्यात आली. २०२० मध्ये नऊ, २०२१ मध्ये २६, २०२२ मध्ये १८ तर २०२३ मध्ये ५१ टोळ्यांवर मकोका कारवाई करण्यात आली आहे. तसेच चालू वर्षात म्हणजेच २०२४ मध्ये १२ टोळ्यांवर मकोका कारवाई करण्यात आली आहे.

गुन्हेगारीला लावला चाप

पोलिसांनी टोळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई केल्याने टोळ्यांमधील गुन्हेगार थेट तुरुंगात गेले आहेत. त्यामुळे शहरात होणारे टोळ्यांमधील वाद, खून, खुनाचा प्रयत्न अशा अनेक गुन्ह्यांना चाप बसला आहे. त्याचप्रमाणे सध्या अस्तित्वात असणाऱ्या टोळ्याही पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे गुन्हे करण्यास धजावत नाहीत.

खान, शिंदे व श्रीगोंड टोळीवर मकोका

खान, शिंदे व श्रीगोंड या तीनही टोळ्या शहरातील कुख्यात गुन्हेगारांच्या टोळ्या आहेत. या टोळीतील सदस्यांवर विविध प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारीचा समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशाने चालू वर्षात १२ टोळ्यांवर मकोका कारवाई करण्यात आली असून, त्यामध्ये या तीन टोळ्यांचाही समावेश आहे.

गेल्या सहा वर्षांतील मकोका कारवाई

वर्ष टोळ्या गुन्हेगार
२०१८
२०१९ ५९
२०२० ५०
२०२१ २६ १८७
२०२२ १८ १२९
२०२३ ५१ ३५७
२०२४ १२ ५८

 

"मकोका कारवाईमुळे गुन्हेगारांवर मोठा वचक बसत आहे. गेल्या दोन वर्षांत सर्वाधिक मकोका कारवाई करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यांची संख्या घटली आहे. भविष्यातही गुन्हेगारी टोळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई सुरूच राहणार आहे."

- वसंत परदेशी, अतिरिक्त पोलीस आयुक्त

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest