Crime News : मुंबई पोलीस असल्याचे भासवित ज्येष्ठाला १८ लाखांचा गंडा, स्काईप आयडीद्वारे केला संपर्क

मुंबई पोलिसांचा लोगो वापरून मुंबई सायबर क्राईम ऑनलाईन कंप्लेंट नावाचा स्काईप आयडी तयार करण्यात आला होता. त्याचा वापर करूनच ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 10 Oct 2023
  • 02:51 pm
Crime News : मुंबई पोलीस असल्याचे भासवित ज्येष्ठाला १८ लाखांचा गंडा, स्काईप आयडीद्वारे केला संपर्क

संग्रहित छायाचित्र

ड्रग्ज तस्करी आणि मनी लोंड्रिंग होत असल्याची घातली भीती

लक्ष्मण मोरे

पुणे : मुंबई पोलीस असल्याची बतावणी करीत ज्येष्ठ नागरिकाला स्काईप आयडीद्वारे संपर्क साधून त्यांच्या खात्यामधून मनी लॉन्ड्रीग आणि ड्रग्जची तस्करी होत असल्याची भीती घालत १८ लाख रुपयांना फसवण्यात आले. त्याकरिता मुंबई पोलिसांचा लोगो वापरून मुंबई सायबर क्राईम ऑनलाईन कंप्लेंट नावाचा स्काईप आयडी तयार करण्यात आला होता. त्याचा वापर करूनच ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सतीश नारायण वैद्य (वय ६१, रा. कपिल आसमंत सोसायटी, पाषाण सुस रोड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मुंबई पोलिसांचा लोगो असलेले मुंबई सायबर क्राईम ऑनलाईन कंप्लेंट असे प्रोफाइल तयार केले.  या आयडीद्वारे आरोपींनी वैद्य यांना कॉल केला. फेडेक्स कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या आरोपीने मुंबई पोलीस असल्याची बतावणी करीत त्यांचा विश्वास संपादन केला.

वैद्य यांच्या नावाने मुंबई ते तायवान असे पार्सल पाठविण्यात आलेले असून त्यामध्ये बेकायदेशीर ड्रग्ज सापडल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यांच्या बँक खात्यामधून मनी लॉन्ड्रीग होत असल्याचे त्यांना तोतया पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कारवाई करण्याची भीती घालत बँक खात्याची पडताळणी करण्याच्या नावाखाली त्यांच्या खात्याची सर्व माहिती घेण्यात आली. त्याद्वारे खात्यामधून १८ लाख ११ हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगून त्यांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी वैद्य यांनी पोलिसांकडे अर्ज दाखल केला होता. त्यावरून पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest